करमुसे यांना मारहाण : गृहमंत्र्यांचा आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न- किरीट सोमय्या

Kirit Somaiya

ठाणे : ठाण्यातील इंजिनीअर अनंत करमुसे यांच्या मारहाण करण्याच्या प्रकरणात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे शुक्रवारी केली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आव्हाड यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप यावेळी त्यांनी केला.

गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाथ’ बंगल्यावर करमुसे या अभियंत्याला १० ते १५ जणांनी जबर मारहाण केली होती. या प्रकरणात आधी आव्हाड यांच्या काही कार्यकर्त्यांना  अटकही झाली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी आणखी तीन पोलिसांना अटक झाली. त्या तिघांनाही जामीन मिळाला आहे. यातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करावी. या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे शुक्रवारी सोमय्या यांच्यासह ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या शिष्टमंडळाने केली.

आव्हाड यांच्या निवासस्थानी करमुसे यांना ५ एप्रिल रोजी मारहाण झाली होती. मंत्र्याच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस कर्मचारीच करमुसे यांना त्यांच्या घरातून घेऊन गेले होते. सहा महिन्यांनंतर त्या तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही; त्याची चौकशीही केली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाने पोलीस आयुक्तांना हे निवेदन दिले.

या प्रकरणात अटक झालेल्या पोलिसांच्या चौकशीत काय माहिती मिळाली? करमुसे यांना त्यांच्या घरातून आणण्यासाठी कोणी आदेश दिला होता? फिर्यादीत, एका मंत्र्यासमोर मारहाण झाल्याचा उल्लेख आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी काय तपास केला? असे प्रश्न भाजपाने विचारले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER