नागपूर येथे गुंडाची जमावाकडून हत्या

nagpur

नागपूर येथे आशिष देशपांडे या गुंडाच्या उपद्रवांनी संतप्त झालेल्या लोकांनी आज पहाटे सामूहिक हल्ला करून त्याची हत्या केली.


नागपूर : नागपूर येथे आशिष देशपांडे या गुंडाच्या उपद्रवाने संतप्त झालेल्या लोकांनी आज पहाटे सामूहिक हल्ला करून त्याची हत्या केली.

शांतिनगर परिसरात आशिषचा उपद्रव होता. वस्तीतील गल्ल्यांमध्ये धोकादायक दुचाकी चालवून लोकाना घाबरवणे हा त्याचा आवडता छंद होता. याचा महिलांना जास्त त्रास होता. अनेकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्या होत्या; शिवाय तो वस्तीतील लोकांशी भांडायचा, धमक्या द्यायचा; पण पोलिसांनी या तक्रारींवर कारवाई केली नाही, असा आरोप आहे.

सोमवारी रात्री आशिषने वेडीवाकडी दुचाकी चालवून ममता ढोक या महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न केला. ममताने आशिषला जाब विचारल्याने तो संतापला आणि ममतावर त्याने हल्ला केला. ममताने याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे वस्तीत पोलीस आले तेव्हा आशिष पळून गेला. पोलीस परत गेल्यावर मध्यरात्रीनंतर तो परत आला आणि हातात चाकू घेऊन लोकांच्या मागे धावू लागला. यामुळे लोक संतापले आणि सळाकी, विटा, चाकू, दगड इत्यादी हातात येईल त्या वस्तूने आशिषवर हल्ला केला. या हल्ल्यात तो ठार झाला.

या प्रकरणात पोलिसांनी पाच युवकांना अटक केली असून काही संशयित फरार आहेत.

ही बातमी पण वाचा : मॉल्स आणि कपड्याचा दुकानातील चेंजिग रुमची पोलिस तपासणी करणार