आसाम सरकारने फेटाळली काँग्रेसची ‘मियां म्युझियम’ची मागणी

Miyan Museum & Himat Biswa

गुवाहाटी : राज्यात ‘मियां म्युझियम’ स्थापन करा, ही काँग्रेसची मागणी आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी फेटाळली. श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे मुस्लिमांच्या संस्कृतीची माहिती देणारे संग्रहालय स्थापन करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र या ठिकाणी आसामची संस्कृती दर्शविणारे संग्रहालय आहे.

ते घुसखोर बांगलादेशी

ही मागणी फेटाळताना हिमंत बिस्वा सरमा म्हणालेत, काँग्रेस ज्या मियांचा आसाममधील नागरिक असा उल्लेख करत आहे ते मूळचे घुसखोरी केलेले बांगलादेशी मुस्लिम आहेत. आसाममधील नागरिक नाहीत. स्थानिक त्यांना ‘मियां’ म्हणातात. या मियांची संस्कृती आसामची संस्कृती नाही. घुसखोरांची संस्कृती दर्शविणारे ‘मियां म्युझियम’ स्थापन करणार नाही.

काँग्रेसच्या आमदाराने केली होती मागणी

काँग्रेसचे बारपेटा जिल्ह्यातील बागबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार शर्मन अली अहमद यांनी पत्र पाठवून, आसामचे नागरिक ज्यांना आपण ‘मियां’ म्हणतो त्यांची संस्कृती दर्शविणारे एक स्वतंत्र संग्रहालय ‘मियां म्युझियम’ स्थापन करण्याची मागणी केली होती.

मदरसे आणि संस्कृत केंद्रांचे अनुदान बंद

पुढच्या वर्षी (२०२१) ला आसाममध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीआधीच आसाम सरकारने राज्यातील सर्व मदरसे आणि संस्कृत केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात सरकारी अनुदानातून धार्मिक आणि शालेय असे दोन्ही प्रकारचे शिक्षण एकाच ठिकाणी देणाऱ्या सर्व शिक्षणसंस्था बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

राज्यात सरकारी अनुदानातून फक्त शालेय शिक्षण दिले जाईल. या शिक्षणात आसामची संस्कृती समजावून सांगितली जाईल. पण विशिष्ट धर्माचे पालन करण्यासाठी दररोज प्रथा आणि परंपरा शिकवण्याचे प्रकार बंद केले जातील. नोव्हेंबर महिन्यापासून कठोरपणे हा आदेश अंमलात आणण्याची तयारी सुरू आहे.

शालेय शिक्षणासाठी देणार अनुदान

सरकारी निधी घेऊन शिक्षणासोबत फक्त कुराण, फक्त बायबल किंवा फक्त गीता शिकवणे योग्य नाही; त्यामुळे आसाम सरकारने सरकारी अनुदानातून फक्त शालेय शिक्षण (Education) आणि आसामची संस्कृती शिकवायची असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आसाममध्ये घुसखोर आणि भूमिपुत्र हा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा वाद चिघळू नये आणि राज्याविषयी चुकीची माहिती प्रसारित होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे, असे आसाम सरकारने शिक्षणाविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर करताना सांगितले. या निर्णयामागील भूमिकेच्या आधारे काँग्रेसच्या आमदाराने केलेली ‘मियां म्युझियम’ची मागणी फेटाळत आहे, असे आसामचे अर्थ आणि शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER