अस्साच नवरा हवा

prajakta mali

सध्या मुलगी बिनधास्त अशी टॅगलाइन घेऊन महाराष्ट्राच्या भटकंतीमध्ये रमलेल्या प्राजक्ताच्या घरी नवी पाहुणी आल्याचे तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून एव्हाना चाहत्यांना कळलेच असेल. तिला भाची झाल्यामुळे आत्याबाई प्राजक्ता भलतीच खुश आहे. सिनेमा, मालिका, नाटक, निवेदन, जाहिरात सगळं काही छान सुरू आहे प्राजक्ताचं. मग आता काय राहिलं बरं… अरे हा, आता लग्नाचं बघायला हवं ना. अगदी असाच विचार प्राजक्ताच्या घरच्यांच्या मनात आला आणि त्यांनी प्राजक्तासाठी नवरा शोधायला सुरू केलंय. हो हो, प्राजक्ता अजूनही सिंगल असून तिलाही अरेंज मॅरेज (Arrange Marriage) करायचं आहे त्यामुळे तिला प्रपोज करणाऱ्यांनी आता फक्त तिचा होणारा नवरा कोण या पोस्टकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे. प्राजक्ता लग्नाला तयार झाली असली तरी तिच्या स्वप्नातील राजकुमार कसा पाहिजे याच्या अटीची जंत्रीच तिने आईबाबांना दिली आहे. त्यामुळे अस्साच नवा हवा म्हणणाऱ्या प्राजक्ताचं सध्या जोरदार वरसंशोधन सुरू झालं आहे.

रूंजी मालिकेत एका छोट्याशा भूमिकेत दिसलेली प्राजक्ता थेट पुढच्या जुळून येती रेशीमगाठी (Julun Yeti Reshimgathi) या मालिकेत लीड रोलमध्ये दिसली. या मालिकेतील तिची मेघना ही भूमिका चांगलीच गाजली. हास्यजत्रा या शोची निवेदक म्हणूनही प्राजक्ताने छाप पाडली. लॉकडाउनमध्ये प्राजक्ताच्या सौंदर्याच्या टिप्स अनेकींनी फॉलो केल्या. लॉकडाउन संपल्यानंतर तिला मस्त महाराष्ट्र या शोची ऑफर आली आणि सध्या ती महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांची सफर करत आहे.

करिअरच्या बाबतीत प्राजक्ताचं सगळं वेळेवर झाल्यामुळे ती तर खुश आहेच पण तिच्या घरचेही सगळे आनंदात आहेत. आता मुद्दा आलाय तो प्राजक्ताच्या लग्नाचा. गेल्या काही दिवसात बऱ्याच अभिनेत्रींच्या लग्नाच्या बातम्या येत असताना प्राजक्तानेही तिच्या सोशल मीडियावर तिला कसा नवरा हवा आहे याची पोस्ट शेअर केली. आता खुद्द प्राजक्तानेच तिला कसा नवरा हवा आहे हे सांगितल्यामुळे ती अफवा आहे किंवा प्राजक्ताबाबत काही गॉसिप सुरू आहे हे म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

ही बातमी पण वाचा : माझे डोहाळे पुरवा

प्राजक्ताला अभिनयातच करिअर करायचे आहे. ती उत्तम डान्सरही आहे. शिवाय काही शो, सोहळे यानिमित्ताने तिला प्रवास करावा लागतो. थोडक्यात काय तर या क्षेत्रातील सगळ्या गोष्टी समजून घेणारी व्यक्ती आयुष्याचा जोडीदार असेल तर लग्न करण्याचा जास्त आनंद आहे असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट वाचून अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. जर अभिनयाचं क्षेत्र समजून घेणाराच नवरा हवा असेल तर याच क्षेत्रातला का शोधत नाहीस असंही तिच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये म्हटलय. पण प्राजक्ता तिच्या म्हणण्यावर ठाम आहे.

आता रूपेरी इंडस्ट्री म्हटलं की काही गॉसिप सुरू असतं. कामाच्या निमित्ताने रात्रीची शिफ्ट असते. कधी सण उत्सव असले तरी शूटिंगसाठी बाहेरगावी जावं लागतं. वाढदिवसासह आयुष्यातील काही महत्वाच्या क्षणीही घरी राहू याची काही शाश्वती नसते. हे सगळं आधीच माहिती असलेला किंवा माहिती नसेल तर समजून घेणाऱ्या मुलाशी मला लग्न करायचं आहे असं प्राजक्तानं सांगून टाकलं आहे. खरंतर असा मुलगा नवरा म्हणून प्राजक्ताला इंडस्ट्रीतच मिळू शकतो पण तिला इंडस्ट्रीतल्या कुणाशी लग्नगाठ बांधायची नाहीय. त्यामुळे प्राजक्ताच्या आईवडीलांनी तिचे नाव काही मॅरेज मॅट्रीमोनी साइटवर नोंदवले आहे.

अजून तरी प्राजक्ताच्या घरी कांदेपोह्याचा कार्यक्रम झालेला नाही. सध्या तरी मुलांचे बायोडेटा पाहणे इथपर्यंतच प्राजक्ताच्या लग्न ठरवण्याची गाडी आली आहे. अगं प्राजक्ता, यंदा लग्न करूया तुझे असं म्हणणाऱ्या आईबाबांचा शब्द तर तिने मोडलेला नाही, पण अस्साच नवरा पाहिजे म्हणत तिने तिच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. इकडे प्राजक्ता बिनधास्तपणे महाराष्ट्र पालथा घालतेय आणि तिकडे माळी फॅमिली प्राजक्तासाठी तस्साच नवरा शोधण्यासाठी मॅट्रीमोनी साइटमधील कोण मुलगा आपला जावई होईल याचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER