अस्मिताला लागणार खूळ

Asmita Deshmukh

माणसानं आयुष्यात एकातरी गोष्टीसाठी वेडं असावं हे वाक्य आपण फिलॉसॉफी म्हणून अनेकदा ऐकलं आहे. ते खरंही आहे. कुणी छंदासाठी वेडं असतं तर कुणी स्वप्नासाठी. पण सगळ्यांत जास्त वेडेपणा करता येतो तो प्रेमात. एकदा का प्रेमाचे खूळ लागले की मग तहानभूक काहीच आठवत नाही. असंच काहीसं होणार आहे अभिनेत्री अस्मिता देशमुख (Asmita Deshmukh) हिच्याही आयुष्यात. पण खऱ्या आयुष्यात नव्हे बरं का, तर पडद्यावरच्या आयुष्यात. ‘देवमाणूस’ या मालिकेत डिंपल ही भूमिका करणाऱ्या अस्मिताला हिरॉईन बनण्याचं वेड लागलेलं आहेच; पण आता अस्मिताला प्रेमानं किती खुळं केलं आहे हे लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘खूळ लागलं’ या नव्या अल्बममधून अस्मिता तिच्या अभिनयाची डबल ट्रीट देणार आहे.

पहिलीच मालिका आणि त्यातील लोकप्रिय झालेली भूमिका यामुळे अस्मिता सध्या खूपच खूश आहे. साताऱ्यातील एका सत्य घटनेतील प्रसंगांशी मिळतीजुळती असलेली ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. म्हटलं तर नायिका, म्हटलं तर सहकलाकार, म्हटलं तर कथेतील केंद्रबिंदू अशा अनेक पैलूंनी परिपूर्ण असलेला डिंपलचा रोल अस्मिताने अगदी चोख बजावला आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाने आणि लोकप्रियतेने तिला ‘खूळ लागलं’ या म्युझिक अल्बमची संधी दिली. सारेगमपफेम आणि सध्याचा प्रयोगशील युवा गायक रोहित राऊत याने गायलेल्या ‘खूळ लागलं’ या अल्बममध्ये अस्मिता रोमँटिक मूडमध्ये दिसणार आहे. वेड म्हणण्यापेक्षा खूळ या शब्दात जरा वेडेपणाची जास्तच नशा आहे. आणि असं देहभान हरपून लागणारं खूळ प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकानं अनुभवलं आहे. हाच अनुभव अस्मिता तिच्या नव्या अल्बममधील अभिनयातून दाखवून देण्यासाठी उत्सुक आहे. ‘खूळ लागलं’ हा अल्बम रोमँटिक असल्याने ‘देवमाणूस’ मालिकेतील डिंपलच्या गावरान लूकपेक्षा या अल्बममध्ये अस्मिताचा लूक स्टनिंग असणार हे अल्बमच्या पोस्टरवरून दिसतच आहे. अस्मिताचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी तिचे चाहतेही खूप आतुर झाले आहेत.

यानिमित्ताने अस्मिता म्हणाली, शाळा-कॉलेजमध्ये नाटक, एकांकिका केल्यानंतर काही प्रायोगिक नाटकांच्या व्यावसायिक प्रयोगात मी काम करत होते. ‘देवमाणूस’ या मालिकेच्या निमित्ताने मी टीव्ही विश्वात आले आणि माझं जगच बदलून गेलं. डिंपल या भूमिकेने मला अभिनेत्री होण्याच्या स्वप्नाचा प्रवास सोपा केला. जशी या मालिकेत डिंपी अभिनेत्री होण्याचं स्वप्नं पाहते तो अनुभव मी खऱ्या आयुष्यातही घेतला आहे. डिंपल ही गावाकडची मुलगी असल्याने तिची भाषा, तिचं वावरणं, ड्रेसिंग हे सगळं शिकत शिकत मी ही भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकले याचा आनंद आहे. ‘खूळ लागलं’ या अल्बममध्ये मला थोडं मॉडर्न दिसायचं होतं. प्रत्यक्ष आयुष्यात मी खूप साधीही नाही आणि खूप मॉडर्नही नाही. त्यामुळे अभिनेत्री म्हणून प्रत्येक व्यक्तिरेखेचा लूक साकारत त्या भूमिकेशी समरस होण्याचे आव्हान वाटते. डिंपलच्या बाबतीतही ते आव्हान होते आणि आता ‘खूळ लागलं’ या अल्बममध्ये आजच्या तरुण मुलीचा प्रेमात पडल्यानंतरचा अवखळपणा दाखवतानाही ते आव्हान कायम आहे. पण अभिनयात हीच खरी कसोटी असते.

देहूची असलेल्या अस्मिताचे शिक्षण पुण्यातच झाले असून शाळा-कॉलेजमध्ये असतानाच तिने नाटकात काम करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अभिनेत्रींपैकी अस्मिता आहे. विशेष म्हणजे ‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवर ऑफ कॅमेरा सुरू असलेली धमाल व्हिडीओमधून अस्मिता शेअर करत असते. अस्मिताला मजेशीर व्हिडीओ बनवायला खूप आवडतं. मानसशास्त्रात अस्मिताने पदवी घेतली असल्याने समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपणे हा तिचा रिकाम्या वेळेतील उद्योग असतो. याशिवाय अस्मिताला गायलाही आवडते. पेंटिंगवरची तिची पकड खूप छान आहे. गाण्याची आवड असल्यानेच म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची तिची खूप दिवसांपासूनची हौस होती, जी ‘खूळ लागलं’ या अल्बमने पूर्ण केली आहे. डिंपल बनून चाहत्यांना तिने खूळ लावलं आहेच; आता नव्या अल्बममधून ती काय जादू करते हे पाहण्यासाठी थोडं थांबावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button