मोदींकडे मदतीची मागणी केल्यास फडणवीस जनतेसोबत असल्याचे सिद्ध होईल – नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई :- तौक्ते वादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) आग्रहाची विनंती करायला हवी. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. मात्र त्यांची सध्याची भूमिका बघितल्यास फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होऊ लागले आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त असल्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे हे मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले आहे. राज्य सरकारची यंत्रणा, प्रशासन कोकणातील नुकसानीचा आढावा घेत आहे. पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागांचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून पुढे येईल. त्यानंतर निश्चितरूपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडिंग ऑर्डरपेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त मदत देण्याची राज्य सरकारची भूमिका असेल, असे मलिक यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र फडणवीस केंद्राकडे आग्रह धरत नाही आणि राज्य सरकार काय देणार यावर बोलत आहेत.

फडणवीस महाराष्ट्रासोबत आहेत की भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत हे त्यांनी सांगावे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा केला नाही. ते गुजरातला गेलेत. गुजरातला एक हजार कोटींची मदत जाहीर केली. आता जनता प्रश्न निर्माण करू लागल्यावर आमच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केला जात आहे. आम्ही भरपाई देणारच आहोत; पण आधी फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीचे खडसे, शेट्टी, तर शिवसेनेच्या मातोंडकर यांचे आमदारकीचे स्वप्न लवकरच पूर्ण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button