आरक्षणाबाबत पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितली मात्र, संभाजी राजेंनी व्यक्त केली खंत

PM Modi & Shambhaji Raje

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) अधिकच आक्रमक झाले आहे. राज्य सरकारने मंगळवारी केलेल्या घोषणा अपुऱ्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने मोठ्या मनाने आर्थिक मदत वाढवून दिली पाहिजे. तसंच या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) भेटीसाठी वेळ मागितली आहे, मात्र अद्यापही त्यांनी वेळ दिली नसल्याचं म्हणत त्यांनी खंतही व्यक्त केली. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.

यावेळी संभाजी राजे म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजासाठी नऊ निर्णय घेण्यात आले त्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन आहे. पण मी पूर्णपणे समाधानी नाही हे परखडपणे व्यक्त करायचं आहे. सारथी, अण्णासाहेब विकास महामंडळ यांच्यासाठी मदत जाहीर केली असली तरी मला आकडे काही पटलेले नाहीत. ३२ टक्के मराठा समाजासाठी १३० कोटी कमी आहेत. किमान १००० कोटी तरी निधी द्यायला हवा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, करोना साथीमुळे मी परिस्थिती समजू शकतो पण मराठा समाजाला काही ठोस द्यायचं असेल, सारथीला आपल्या पायावर उभं करायचं असेल तर इतक्या कमी पैशात काही होणार नाही. मराठा आरक्षणावर सगळ्यांनी एकत्र बसून एक धोरण तयार करण्याची गरज आहे. हा कोणत्या एका पक्षाचा अजेंडा नाही हे माझं प्रामाणिक मत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सगळ्या पक्षातील खासदारांनी एकत्र यावेत अशी माझी इच्छा आहे. पंतप्रधानांच्या भेटीसाठी भाजपासोबत शिवसेना, राष्ट्रवादी यांनीही पुढाकार घेतला असून आनंदाची बाब आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधानांची वेळ मिळेल तेव्हा आमचे सर्व खासदार येतील असं सांगितलं असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांनीही खासदार येतील असं म्हटलं आहे. अजून वेळ मिळालेली नाही. करोनामुळे कदाचित पंतप्रधान भेटत नसतील. पण मराठा समाजातर्फे पंतप्रधानांनी आमचं म्हणणं ऐकावं अशी विनंती केली आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER