सुनीलकुमारने संपवला ग्रीकोरोमन कुस्तीच्या सुवर्णपदकाचा दुष्काळ

नवी दिल्ली : कुस्तीगीर सुनील कुमारने ग्रीको रोमन कुस्तीतील भारताचा पदकांचा दुष्काळ संपविला आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेत त्याने मंगळवारी ८७ किलो वजनगटाचे सुवर्णपदक जिंकले. भारताला आशियाई कुस्ती स्पर्धेत तब्बल २७ वर्षानंतर ग्रीकोरोमन प्रकारात हे सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी १९९३ मध्ये पप्पू यादव यांनी ग्रीकोरोमनच्या ४८ किलोगटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर मात्र ग्रीकोरोमनमध्ये भारताला या पदकाने हुलकावणीच दिली होती. के.डी.जाधव इन्डोअर स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे.

क्रिकेट आणि सचिन तेंडूलकरबद्दल बोरीस बेकर काय म्हणाला?

गेल्यावेळच्या आशियाई स्पर्धेत भारताला एकच सुवर्णपदक जिंकता आले होते. आता सुनीलकुमारने पहिल्याच दिवशी विजेतेपद पटकावून भारताला गेल्यावेळपेक्षा अधिक यश मिळण्याची आशा निर्माण केली आहे. अंतिम सामन्यात त्याने किरगिझस्तानच्या अझात सालीदीनोव्हचा ५-० असा धुव्वा उडवला. गेल्या वर्षी सुनीलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. रौप्यपदकावरुन सुवर्णपदकापर्यंत झालेल्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करताना सुनीलकुमार म्हणतो की, गेल्या वर्षभरात आपण तंत्र सुधारण्यावर खूप मेहनत घेतली आणि आपला बचावसुद्धा भक्कम केला, त्याचा आपल्याला फायदा झाला.

अर्जुन हलाकुर्कीला कास्यपदक

५५ किलोगटात अर्जुन हलाकुर्की हा कास्यपदक विजेता ठरला. या २१ वर्षीय कुस्तीगीराने कास्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या डोंम ह्युक वोन याला ७-४ अशी मात दिली. उपांत्य फेरीच्या लढतीत अर्जुन हा एकावेळी ७-१ असा आघाडीवर होता. मात्र सुवर्णपदक विजेत्या ठरलेल्या इराणच्या पौया मोहम्मद नासेरपूरविरुध्द आक्रामक खेळ करणे त्याला महागात पडले. त्यामुळे शेवटी अर्जुनला ७-८ असा निसटता पराभव पत्करावा लागला.

या पराभवाबद्दल अर्र्जुन म्हणाला की, मी ज्युनियर गट आणि २३ वर्षाआतील गटासारखाच खेळ केला पण ज्युनियर गट आणि सिनियर गटाच्या स्पर्धा व तंत्रात खूप फरक आहे. सिनियर गटात घाई करून चालत नाही हे लक्षात आले. प्रशिक्षकांनीही मला उपांत्य फेरीनंतर शांतपणे व संयमाने खेळायचे सांगितले त्यामुळे कास्यपदकाच्या लढतीत ती चूक टाळता आली, असे कर्नाटकच्या बागलकोटचा हा कुस्तीगीर म्हणाला. अंतिम फेरी गाठू न शकल्याने अर्जुनची नायब सुभेदारपदी बढतीची संधी मात्र हुकली. तो अंतिम फेरीत पोहचला असता तर त्याला ही बढती देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याउलट सुनीलकुमारने उपांत्य लढतीत १-८ अशा पिछाडीवरुन कझाकस्तानच्या अझामत कुस्तुबायेव्ह याला १२-८ अशी मात दिली होती. या लढतीत सुनीलने ११ गूण ओळीने जिंकले.