अश्विनी बनली रक्तदाती

Ashwini became a blood donor

आज काल सेलिब्रिटी कलाकार (Celebrity artists) हे फक्त केवळ काही फॅशन ब्रँडचीच जाहिरात करतात असं नाही तर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात देखील ते आपला सहभाग देत असतात. केवळ सोशल मीडिया पोस्ट पुरता त्यांचा सहभाग नसतो खऱ्या अर्थाने त्या उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी सेलिब्रेटी कलाकार आता सक्रिय झाले आहेत. अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रक्तदान शिबिरमध्ये सहभागी होत रक्तदान (blood donor) केलं आहे. राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रभर सुरू होणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ साताऱ्यातून झाला. रक्तदान करण्यासाठी अश्विनी मुंबईहून थेट सातार्‍याला पोहोचली आणि तिने रक्तदान केलं. कुणाचा तरी जीव तुमच्या रक्ताने वाचू शकतो वाचू शकतो असा संदेशही तिने दिला आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून राणू अक्का या भूमिकेमुळे अश्विनी महागडे (Ashwini Mahagade) घराघरात पोहोचली. जवळपास दोन वर्ष अश्विनी या मालिकेचा एक भाग होती. साहजिकच या मालिकेतील राणू आक्का ही भूमिका साकारण्यासाठी तिने या पात्राचा इतिहासातील वेगवेगळ्या लेखनाच्या माध्यमातून अभ्यास केला. छत्रपती घराण्याची लेक म्हणून राणू आक्का एक व्यक्ती म्हणून कशा होत्या. बंधू संभाजी यांच्यावर कोसळलेल्या अनेक संकटात राणूआक्कानी भोसले घराण्याची लेक म्हणून कशा पद्धतीने त्यांची कर्तव्ये बजावली होती या सगळ्याचा अभ्यास करत असताना अश्विनी ही इतिहासाशी नव्याने जोडली गेली होती. मालिका संपल्यानंतरही इतिहासातील वेगवेगळ्या गोष्टी नव्याने समजून घेण्याचा तिचा प्रवास सुरूच होता. अश्विनी सोशल मीडियावर मराठी स्वराज्य,छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, येसूबाई यांच्याशी निगडित अनेक गोष्टी पोस्ट देखील करत होती.

अश्विनी सांगते ,ऐतिहासिक मालिकांमध्ये भूमिका करायला मिळणं हीच एक कलाकार म्हणून खूप मोठी जबाबदारी असते. मालिका संपल्यानंतरही प्रेक्षक आपल्याला त्या व्यक्तिरेखेने ओळखत असतात, त्यामुळे समाजाविषयी आपली जबाबदारी अधिक वाढते. कर्तव्यांचे आपल्याला सतत भान राहते आणि माझ्या बाबतीतही असंच झालं.

राणूअक्का करण्यापूर्वी इतिहासाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आणि ही भूमिका जगल्यानंतर मराठा स्वराज्याच्या इतिहासाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन हा खूप वेगळा होता, आणि तो निश्चितच अनुभव म्हणून अत्यंत समृद्ध करणारा होता. एखादी गोष्ट बोलणं आणि ती प्रत्यक्ष करण्यात किती फरक आहे हे मला या भूमिकेने शिकवले. या भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर अश्विनी म्हणून मला समाजासाठी काय करता येईल याचा मी सतत विचार करू लागले. हा बदल माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. जेव्हा स्वराज्य प्रतिष्ठानने मला रक्तदान शिबिरात सहभागी होण्याबाबत विचारलं तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मी होकार दिला. एक तर ही राज्य सरकारची रक्तदान चळवळ आहे आणि यानिमित्ताने जर मी रक्तदान करण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकले आणि माझ्यापासून प्रेरणा घेऊन अधिकाधिक रक्तदाते पुढे आले तर खऱ्या अर्थाने मी अभिनेत्री म्हणून समाजाला काहीतरी देऊ शकते हे समाधान खूप मोठं आहे .

अश्विनी महागडेने यापूर्वी अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. रंगभूमीपासून तिच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. प्रायोगिक विविध नाटकांमध्ये अश्विनी महागडे हिने वैविध्यपूर्ण काम केले आहे. सध्या ती, आई कुठे काय करते या मालिकेत अनघा नावाची भूमिका करत आहे आणि ही भूमिका देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER