अश्विनी कुमारांची आत्महत्या रहस्य राहू नये, सीबीआयने तपास करावा, शिवसेनेची मागणी

Ashwani Kumar - CM Uddhav Thackeray

मुंबई : दोन दिवसांपूर्वी सीबीआयचे माजी संचालक मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेनं (Shiv Sena) आजच्या सामानातून अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाप्रमाणे अश्विनी कुमारांच्या (Ashwani Kumar) आत्महत्येचा तपास सीबीआयने (CBI) करावा अशी मागणी केली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर जे अनेक प्रश्न व शंका निर्माण केल्या गेल्या त्या अश्विनी कुमार यांच्याबाबतीतही निर्माण होऊ शकतात. अश्विनी कुमार का मरण पावले, हे रहस्य राहू नये. शिमल्याचे पोलीस तपास करतीलच. पण सी.बी.आय.चे नेतृत्व केलेल्या अश्विनी कुमार यांच्या आत्महत्येने सी.बी.आय.ने तरी पापण्यांची उघडझाप करावी. आपल्या देशात नक्की काय चालले आहे तेच कळायला मार्ग नाही. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली असे वैद्यकीय पुरावे येऊनही ते मानायला काही लोक तयार नाहीत. हाथरसची तरुणी मरणाच्या दारातून सांगतेय, माझ्यावर बलात्कार झाला. त्यावर सरकार विश्वास ठेवायला तयार नाही. आता सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनी कुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. ते का मेले, हे रहस्य शोधण्यात कोणालाच रस नाही. काळ मोठा कठीण आला आहे हेच खरे!

आजचा सामनातील अग्रलेख…

सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. देशाचे सामाजिक, राजकीय वातावरण बलात्कार, आत्महत्या अशा प्रश्नी गढूळ झाले असतानाच अश्विनीकुमार यांचा मृतदेह त्यांच्या सिमल्यातील घरी लटकलेल्या अवस्थेत सापडावा हे धक्कादायक आहे. सी.बी.आय.च्या प्रमुख संचालकपदी काम केलेली व्यक्ती नैराश्याने ग्रासते, जगण्यासारखे काही उरले नाही, आयुष्याचाच कंटाळा आलाय म्हणून आत्महत्या करते यावर आपण सगळे डोळे मिटून विश्वास ठेवतो, हे काही पटत नाही. अश्विनी कुमार हे फक्त सी.बी.आय.चेच संचालक नव्हते तर निवृत्तीनंतर ते नागालॅण्ड आणि मणिपूरचे राज्यपालही होते. ते हिमाचल राज्याचे पोलीस महासंचालक होते. दिल्लीत प्रमुख राजकीय नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवणाऱया एसपीजी गटात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. म्हणजे ते मनाने, शरीराने खंबीर होते व त्यामुळेच त्यांच्यावर सरकारने विशेष जबाबदाऱया सोपवल्या. अशी व्यक्ती अचानक आत्महत्या करते व त्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही याचे आश्चर्य वाटते. अश्विनी कुमार यांना खरेच आयुष्याचा कंटाळा आला की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, यावर सध्या हिमाचलात वास्तव्यास असलेल्या ‘नटी’ने भाष्य केले पाहिजे. अश्विनी कुमारांना कोणत्या परिस्थितीत आत्महत्या करावी लागली, हा प्रश्न कर्कश भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी विचारायला हवा. सुशांत प्रकरणात आत्महत्या नसून हत्याच आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यांनी जिवाचा आटापिटा केला त्यांना सी.बी.आय.चे माजी संचालक अश्विनी कुमार यांच्या आत्महत्येमागे काहीतरी रहस्य आहे, कारस्थान आहे असे वाटू नये, हे गौडबंगाल आहे.

मुंबईत सुशांतने आत्महत्या केली. त्याआधी काही दिवसांपासून तो निराश होता. अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. वृत्तवाहिन्या, भाजपा आय.टी. सेल, त्यांचे पुढारी यांनी सुशांत प्रकरणातील अनेक रहस्ये शोधून धोबीघाटावर आणली. तो रहस्यपट पाहून आफ्रेड हिचकॉक, शेरलॉक होम्स, जेम्स बॉण्डसारखे ‘नायक’ही अचंबित झाले असतील. या सर्व हिचकॉक, शेरलॉक होम्सच्या अवलादींना अश्विनी कुमारांच्या लटकलेल्या देहामागे एखादे रहस्य दडलेले आहे याचा सुगावा लागू नये? अश्विनी कुमार एक यशस्वी आणि जिंदादिल पोलीस अधिकारी होते. आपल्या सहकाऱयांत ते लोकप्रिय होते. हिमाचलसारख्या छोट्या पहाडी राज्यातून सी.बी.आय.च्या संचालकपदी पोहोचलेले ते बहुधा एकमेव अधिकारी असावेत. सी.बी.आय.चे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक राजकीय गुंता असलेल्या केसेस सोडवल्या. तशी गाजलेली आरुषी तलवार हत्येसारखी प्रकरणेही तपासली. ते एक ‘प्रोफेशनल’ पोलीस अधिकारी होते. निवृत्तीनंतरही ते एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना शिकवत होते व शिमल्यातल्या एका विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करीत होते. ते त्यांचे आवडीचेच काम होते व त्यात त्यांचा वेळ चांगला जात होता. आय.पी.एस. म्हणून त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदे त्यांना मिळाली. मग निराश होऊन गळफास लावून घ्यावा असे त्यांच्या जीवनात काय घडले, यावर प्रकाश पडणे गरजेचे आहे.

अश्विनी कुमार यांच्या आत्महत्येचे रहस्य यासाठी उलगडायला हवे की, वरिष्ठ पदावर काम करणाऱया अधिकाऱ्यांची मानसिक स्थिती काय आहे? त्यांना कोणत्या दबावाखाली काम करावे लागते? त्यांना असे नैराश्येचे झटके का येतात? त्यांची मानसिक अवस्था बिघडलेली असेल तर ते लोक सैन्य किंवा पोलीस दलाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत काय? अश्विनी कुमार हे पोकळ मनाचे गृहस्थ नव्हतेच. त्यांनी राज्यात व केंद्रात चोख सेवा बजावली आहे. नोकरीत असताना तणाव निर्माण होत असतात. अवघड प्रसंगांना सामोरे जावे लागते. तेव्हा त्यांनी ही सर्व आव्हाने खंबीरपणे पेलली व आता निवृत्तीच्या काळात त्यांनी निराश होऊन मृत्यूला कवटाळले. आपल्या देशात आत्महत्या नवीन नाहीत. गोरगरीब जनता, शेतकरी, बेरोजगार रोजच जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असतात. त्यांना जगण्याची भ्रांत असते म्हणून ते मरणाला कवटाळतात. पण मुंबईत सुशांत व शिमल्यात अश्विनी कुमार यांना अशी भ्रांत नव्हती. तरीही त्यांनी मरणाचाच मार्ग स्वतःच स्वीकारला, असे शिवसेनेने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER