अश्विनी पडली ‘मुकद्दर’च्या प्रेमात

Ashwini Mahangade

शाळेत असताना अनेकांना इतिहास हा विषय त्यातल्या सनावळ्यामुळे नावडता असला तरी इतिहासातील शौर्यगाथा वाचायचं म्हटलं की, प्रत्येकाला एक वेगळेच स्फुरण येतं. त्यात मराठ्यांचा इतिहास तर अधिकच प्रेरणादायी आहे. त्यामुळे इतिहासावर आधारित पुस्तक एकदा का हातात घेतलं की त्याचं शेवटचं पान येईपर्यंत प्रत्येक जण त्या पुस्तकामध्ये तल्लीन होऊन जातो. नुकताच हा अनुभव अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिनेही घेतला आणि ती ‘मुकद्दर’च्या प्रेमात पडली. तर आता हा मुकद्दर कोण, असं तुम्हाला वाटलं असेल ना ! पण ही कुणी व्यक्ती नाही तर ते एक पुस्तक आहे जे स्वप्नील कोलते या तरुण लेखकाने लिहिले आहे. मराठ्यांच्या शौर्यगाथेचा धगधगता लेखन-प्रपंच मांडत स्वप्नील कोलते यांनी हे पुस्तक लिहिलं आणि ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलं;

पण दुर्दैवाने गेल्या वर्षी एका रस्ता अपघातात स्वप्नील यांचे निधन झाले. अश्विनी महांगडे ही जितकी सुज्ञ अभिनेत्री आहे तितकीच ती चोखंदळ वाचकही आहे. तिच्या हाती जेव्हा ‘मुकद्दर’ हे पुस्तक लागले तेव्हा तिने त्या पुस्तकाचा फडशा पाडला. पुस्तक वाचून झाल्यानंतर तिला एक वेगळीच रुखरुख लागून राहिली आणि ती म्हणजे आपण स्वप्नील कोलते यासारख्या प्रतिभावंत लेखकाला आजपर्यंत कसे कसे भेटलो नाही. याच भावना अश्विनीने तिच्या सोशल मीडिया पेजवर व्यक्त केल्या आहेत. तू जाण्याची इतकी घाई का केलीस ? तुला भेटता आलं नाही ही खंत माझ्या आयुष्यभर मनात राहील असं म्हणत अश्विनीने ‘मुकद्दर’ला तर सलाम केलाच आहे; पण स्वप्नीलच्या लेखणीलाही तिने मानाचा मुजरा केला आहे.

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये शिवकन्या राणू अक्का या भूमिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे ही घराघरांत पोहचली. खरे तर अश्विनीच्या अभिनयाची सुरुवात ही तिच्या वाई या गावातील जत्रांमधील नाटकांमधून झाली. शाळा-कॉलेजच्या जीवनात तिचं अभिनय वेड सुरू होतं पण त्यानंतर मात्र जेव्हा तिने ठरवले की, अभिनयातच करिअर करायचं तेव्हा अश्विनीने मालिकांपासून अभिनयाला सुरुवात केली. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत शिवकन्या राणूअक्का ही भूमिका करत असताना या निमित्ताने तिला शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर मात्र ती केवळ भूमिका होती म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचा इतिहास व त्यातील घडामोडी या सगळ्याची तिला गोडी लागली आणि त्यातूनच तिने अनेक गोष्टी जाणून घेतल्या.

अश्विनी सांगते, ‘मुकद्दर’ हे पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि या पुस्तकात जो काही मराठ्यांचा शौर्य इतिहास मांडला आहे तो वाचून मी अक्षरशः थक्क झाले. स्वप्नील कोलते यांची लेखणी खूपच भन्नाट आहे. शिवाय इतिहास हा विषय न आवडणाऱ्या लोकांनाही हे पुस्तक वाचल्यानंतर इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारी ही साहित्यकृती आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मी प्रेमात पडले. पण या पुस्तकाचे लेखक स्वप्नील यांची भेट का घडू शकत नाही याची वेगळीच हुरहुर मला लागली. खरं तर मी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेच्या निमित्ताने इतिहासविषयी लेखन करणाऱ्या अनेक लेखकांना भेटले. काही जण सेटवर यायचे तर काही आवर्जून फोन करून बोलायचे आणि आणि भेटी व्हायच्या. पण या प्रवासात स्वप्नील कोलतेसारख्या लेखकाची भेट राहून गेली. खरं तर स्वप्नील यांच्या आयुष्याचा अंत अपघातात झाला हा नियतीचा खूप मोठा आघात होता. इतिहासविषयक लेखन करणारे व संशोधन करून लेखन करणारे लेखक मुळातच कमी आहेत आणि यामध्ये स्वप्नील यांचे नाव होते. पण त्यांना नियतीने जास्त आयुष्य दिले नाही.

अश्विनी सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका करत आहे. तसेच यापूर्वी तिने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये सेलिब्रिटी पॅटर्न या पर्वामध्येदेखील विनोदी अभिनय केला होता. रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन या उपक्रमाच्या माध्यमातून अश्विनी एक असं स्वयंपाक घर चालवते ज्यामधून गोरगरिबांना कमी किमतीमध्ये पोटभर जेवण दिलं जातं. शिवाय मोरया प्रोडक्शन ही तिची निर्मिती संस्था आहे ज्या माध्यमातून तिने महावारी या नावाची वेबसिरीज बनवली होती. ही स्त्रियांच्या मासिक पाळी आणि त्याविषयीच्या श्रद्धा अंधश्रद्धा यावर बेतली होती. या वेब सिरीजसाठी अश्विनीला प्रेरणा पुरस्कारानेदेखील सन्मानित केले आहे. केवळ एखाद्या भूमिकेसाठी अभिनय करायचा आणि त्या मालिका किंवा सिनेमाच्या निमित्ताने प्रसिद्धी मिळवायची यापलीकडे काही कलाकार मंडळी आहेत त्यांच्या यादीत अश्विनीचे नाव आवर्जून घेतले जात आहे. ती समाजासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असते.

शिवकन्या राणूअक्का या भूमिकेने इतिहासाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिलीय. शिवाय इतिहास काळातील ज्या स्त्रिया होत्या तर त्यांच्यामधली बलस्थान याची जाणीवही या मालिकेच्या निमित्ताने झाली आणि त्यामुळेच ही मालिका संपल्यानंतरही मी इतिहास आणि समाज या दोन्ही गोष्टींची स्वतःला बांधून ठेवले आहे, असे अश्विनी अभिमानाने सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER