अश्विनी झाली भावुक

Ashwini Bhave - Rajiv Kapoor

प्रत्येक कलाकाराला त्याच्या अभिनयासाठी संधी देणारा गॉडफादर आयुष्यामध्ये महत्त्वाचा असतो. प्रत्येक मराठी कलाकाराला असं वाटत असतं की, त्यांना हिंदी सिनेमात एक संधी मिळावी, जेणेकरून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत त्यांना पोहचता येईल. अशी संधी मराठीतील अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) हिला ‘हिना’ या सिनेमाने दिली. अश्विनीच्या नावावर अनेक मराठी सिनेमे होते; पण या सिनेमाने तिच्या प्रसिद्धीचा आलेख नक्कीच वाढवला आणि यामध्ये मोठे योगदान होते ते कपूर कुटुंबाचे. ‘हिना’ या सिनेमात अश्विनी भावे हिची निवड करणाऱ्या आर. के. बॅनरमध्ये एक नाव होतं ते राजीव कपूर यांचं. हिनाच्या निमित्ताने राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांच्या सहवासातील अनेक क्षण अभिनेत्री अश्विनी भावेच्या डोळ्यासमोर तरळले. मुंबईत राजीव कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार होत असताना सातासमुद्रापार अमेरिकेतल्या घरी अश्विनीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ती भावुक झाली. राजीव यांच्या अनेक आठवणी सांगणारा एक व्हिडीओ अश्विनीने नुकताच शेअर केला आहे. राजीव कपूर यांच्या जाण्यानंतर अश्विनीने त्या वेळच्या काही आठवणी ओठावर आणल्या.

हिंदी सिनेमा इंडस्ट्रीमधलं एक प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी घराणे म्हणून कपूर फॅमिली सगळ्यांनाच परिचित आहे. कपूर कुटुंबातील अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहात अश्विनीने पोस्ट केलेला हा व्हिडीओ अनेक प्रेक्षकांपर्यंत तसेच अश्विनीच्या चाहत्यांपर्यंत पोहचला. अश्विनी भावे हे मराठी नाव हिना सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये झळकलं. याचा फायदा निश्चितच अश्विनीच्या अभिनय कारकीर्दीला झाला. हिनाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी राजीव कपूर यांच्याकडे असल्यामुळे या सिनेमाच्या ऑफस्क्रीन ज्या ज्या गोष्टी सुरू असायचा त्यामध्ये राजीव कपूर हिरीरीने भाग घ्यायचे. याच अनुषंगाने अश्विनीने राजीव कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या व्हिडीओ पोस्टमध्ये उलगडले आहेत.

या पोस्टमध्ये अश्विनी म्हणतेय की, हिना हा सिनेमा कपूर घराण्याने पाहिलेल्या अनेक स्वप्नांपैकी एक होता. ऋषी कपूर-झेबा बक्तीयार यासारख्या हिंदीतल्या कसलेल्या कलाकारांसमोर माझ्यासारख्या मराठी मुलीची निवड होणे हे खरंच माझ्यासाठी खूप भाग्याचं होतं. माझी निवड करणारी आर. के. बॅनरची जी टीम होती त्यामध्ये राजीव कपूर हेदेखील होते. मी ‘हिना’ सिनेमासाठी सेटवर पोहचले आणि त्यानंतर जेव्हा या सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं तेव्हा राजीव कपूर यांचा खूप सहवास आम्हा सर्व कलाकारांना मिळाला. कपूर घराण्यातील मुलगा असूनही आणि आर. के. बॅनर हे घरचं प्रॉडक्शन असूनही राजीव कपूर यांचा सेटवरचा साधेपणा, प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने बोलण्याचा स्वभाव हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला होता; कारण त्यापूर्वी मी अनेकदा असं ऐकलं होतं की, हिंदी सिनेमा इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटी इतर भाषांमधून आलेल्या कलाकारांशी नीट बोलत नाहीत. त्यातही मराठी कलाकारांविषयी त्यांच्या मनात अढी असते. पण हे माझे सगळे गैरसमज राजीव कपूर यांच्यासोबत झालेल्या गप्पांनी खोटे ठरवले. राजीव प्रचंड हुशार व्यक्ती होती. त्यांना सिनेमा निर्मितीचा एखादा सीन पडद्यावर कशा पद्धतीने दाखवला गेला पाहिजे याची एक वेगळीच जाण होती. जेव्हा एखाद्या सीनसंदर्भात ते संवाद साधायचे, चर्चा करायचे तेव्हा कागदावरचा सीन जसाच्या तसा पडद्यावर कसा दिसेल हे त्यांच्याकडून ऐकणे म्हणजे अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी विद्यापीठ होतं. राजीव कपूर हे अभिनेते म्हणून यशस्वी झाले नाहीत हा इतिहास आहे; पण आजही मी त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी आठवते आणि त्यांचा सिनेमाबद्दलचा, अभिनयाबद्दलचा दृष्टिकोन आणि त्यांची जाण जेव्हा मला होते तेव्हा खरंच मला हा प्रश्न पडतो की कपूर कुटुंबात जन्मूनसुद्धा अभिनय क्षेत्रात यशस्वी न होण्यामागे काय कारण असेल ? समोरच्या व्यक्तीला उत्तम सीन समजून देण्याचे कौशल्य ज्या माणसाकडे आहे त्या माणसाला कदाचित पडद्यावर यश मिळवता आलं नसेल; पण ऑफ कॅमेरा त्यांची ताकद काय होती हे मी स्वतः अनुभवलेले आहे.

अश्विनीच्या या व्हिडीओमधून हिना या सिनेमाच्या निमित्ताने तिचे कपूर कुटुंबाशी किती चांगले सूर जुळलेले होते हेच दिसून येतं. राजीव कपूर यांच्यासोबतच्या अनेक आठवणी या निमित्ताने उलगडत असताना अश्विनीला भावना आवरता आल्या नाहीत. राजीव माणूस म्हणून खूप वेगळे होते. अशी माणसं मनोरंजन या क्षेत्राची ताकद आहे. पण आता ही माणसं काळाच्या पडद्याआड जात आहेत. अशा माणसांचे विचार आणि त्यांचे दृष्टिकोन खूप महत्त्वाचे आहेत याकडेही अश्विनीने लक्ष वेधले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER