अश्विन डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्यात नंबर वन

Ashwin

रविचंद्रन अश्विन… (Ravichndran Ashwin) भारताचा हा फिरकी गोलंदाज (Spinner) गेल्या कसोटीत डावाच्या पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट काढणारा जगातील एकमेव फिरकी गोलंदाज ठरला होता. आता कसोटी सामन्यांमध्ये २०० डावखुऱ्या फलंदाजांना (Lefties) बाद करणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. ज्यांच्या नावावर सर्वाधिक कसोटी बळी आहेत त्या मुरलीधरन व शेन वॉर्न यांनासुद्धा हा विक्रम जमलेला नाही.

चेन्नई (Chennai) येथील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा (England) डाव १३४ धावांत गुंडाळताना २३.५ षटकात ४३ धावात ५ बळींची कामगिरी करताना त्याने हा विक्रमी द्विशतकी टप्पा गाठला. ७६ कसोटींच्या १४१ डावात अश्विनच्या नावावर आता ३९१ विकेट आहेत. त्यापैकी २०० म्हणजे ५१.२० टक्के विकेट ह्या डावखुऱ्या फलंदाजांच्या आहेत आणि निम्म्याहून अधिक विकेट, खरं तर ३१ टक्क्यांहून अधिक विकेट डावखुऱ्या फलंदाजांच्या असणारा तो एकमेव गोलंदाज आहे.

डावखुऱ्या विकेट्सचे प्रमाण

रविचंद्रन अश्विन —२०० — ५१.२ टक्के
जेम्स अँडरसन —- १९० — ३१.१ टक्के
ग्लेन मॅकग्रा ——– १७२ — ३०.६ टक्के
शेन वॉर्न———— १७२ — २४.३ टक्के
मुरलीधरन———-१९१ — २३.९ टक्के

विशेष म्हणजे अश्विनने आपल्या कारकिर्दीत ज्या फलंदाजांना सर्वाधिक वेळा बाद केले आहे ते सर्वच्या सर्व डावखुरे आहेत. यात डेव्हिड वाॕर्नर (१० वेळा), अॕलिस्टर कूक (९ वेळा), बेन स्टोक्स (९ वेळा), एड कोवन (७ वेळा) आणि जेम्स अँडरसन (७ वेळा) यांचा समावेश आहे.

याशिवाय भारतात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजातही तो आता दुसऱ्या स्थानी आहे. केवळ अनिल कुंबळेनेच त्याच्यापेक्षा अधिक गडी भारतात बाद केले आहे. अनिल कुंबळेच्या नावावर भारतात ११५ डावात ३५० विकेट आहेत तर अश्विनच्या नावावर ८६ डावात २६८ विकेट आहेत. त्याने हरभजनसिंगला मागे टाकले आहे. हरभजनने १०३ डावात २६५ विकेट भारतात काढल्या आहेत. कपिल देव २१९ विकेटसह चौथ्या स्थानी आहेत. परदेशी गोलंदाजात भारतात सर्वाधिक विकेट डेरेक अंडरवूड याच्या ५४ विकेट आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER