
अक्षरशः धुव्वा उडवलेल्या मालिकेत जी दोन नावे इंग्लंडचा (England) संघ कधीच विसरू शकणार नाही ती म्हणजे रविचंद्रन अश्विन(Ravichandran Ashwin) व अक्षर पटेल (Axar Patel). या दोघांनीही आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लिश फलंदाजांना असे नाचवले की ते ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असे बोलायला लागले. अक्षर पटेल हा आपल्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात चारदा पाच बळी मिळवणारा पहिला गोलंदाज ठरला तर रविचंद्रन अश्विन हा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत किमान एक शतकी खेळी आणि ३० च्यावर विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत अशी अष्टपैलू कामगिरी जाॕर्ज गिफन व रिची बेनो यांनी तर सहा सामन्यांच्या मालिकेत इयान बोथम व इम्रान खान यांनी केली आहे; पण चार कसोटींच्या मालिकेत ३०+ विकेट आणि शतकी खेळी करणारा अॕश अण्णा एकमेव.
याशिवाय आणखी एका असाधारण विक्रमासह शेन वॉर्न व मुथय्या मुरलीधरन यांच्या पंक्तीत तो जाऊन बसलाय. तो विक्रम म्हणजे भारतीय संघाचा विजय साजरा करणारी सामन्यातील शेवटची विकेट त्यानेच १८ वेळा काढली आहे. शनिवारी डॕन लाॕरेन्सचा त्रिफळा उडवून त्याने इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांत संपवला आणि भारताच्या एक डाव आणि २५ धावांनी विजयावर शिक्कामोर्तब झाले. विजय साजरा करणारी विकेट १८ व्यांदा काढून त्याने मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली आहे. आता फक्त ऑस्ट्रेलियन शेन वॉर्न त्याच्यापुढे आहे, ज्याने २२ वेळा सामन्यातील अगदी शेवटचा गडी बाद करत आपल्या संघाचा विजय साजरा केला आहे.
श्रीलंकेच्या रंगना हेराथने १४ वेळा, पाकिस्तानच्या वकार युनूसने १३ वेळाआणि ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅकग्रा व दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन यांनी प्रत्येकी १२ वेळा अशी कामगिरी केली आहे. याशिवाय १८९ धावा व ३२ बळींच्या कामगिरीसह मालिकावीर (Man of the series) ठरूनही त्याने विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा हा आठवा मॅन ऑफ दी सिरीज पुरस्कार असून केवळ मुथय्या मुरलीधरन (११ वेळा) व जेकस् कॕलिस (९ वेळा) हे दोनच जण त्याच्यापुढे आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला