आशुतोष गोवारीकर पडद्यावर मांडणार लिज्जत पापड कंपनीची कथा

Ashutosh -Kiara

भव्य चित्रपट बनवण्यात आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowarikar ) प्रख्यात आहे. अगदी आमिर खानच्या लगानपासून ते ऋतिकच्या अकबर जोधापर्यंत आशुतोषने कमालीचे चित्रपट दिले आहेत. भव्यतेचे स्वप्न पाहाणारा आशुतोष नेहमी काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न करतो. लिज्जत पापड घराघरातील नाव झाले आहे. काही महिलांनी घराला आर्थिक मदत व्हावी म्हणून पापड लाटण्याचा छोटेखानी व्यवसाय सुरु केला होता. या व्यवसायाने आता वटवृक्षाचे रुप घेतले आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर अनेक राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र करण्याचे काम लिज्जत पापडाने केले आहे. भव्यतेची आस असलेला आशुतोष आणि महिलांना स्वतंत्र करणारा हा वटवृक्ष आता एकत्र येत आहेत. आशुतोष या वटवृक्षाची कथा पडद्यावर मांडणार आहे.

आशुतोष गोवारीकरने त्याच्या या नव्या चित्रपटावर काम सुरु केले असून यातील मुख्य भूमिकेसाठी कियारा आडवाणीला साईन केले आहे. चित्रपटातील महत्वाच्या सात महिलांपैकी मुख्य महिलेची भूमिका कियारा आडवाणी साकारणार आहे. अन्य महिलांच्या भूमिकेचा शोध स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर घेतला जाणार आहे. आशुतोषच्या चित्रपटात अत्यंत महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने कियारा आडवाणी प्रचंड खुश आहे. आशुतोष सरांमुळे काही तरी वेगळे करण्याची संधी मिळत आहे अशी प्रतिक्रिया कियाराने दिली आहे. कियाराचा अक्षयकुमारसोबतचा लक्ष्मी नुकताच ओटीटीवर प्रसारित झाला होता. पण त्यात तिची काही विशेष भूमिका नव्हती आणि संवादही नव्हते. कियाराचा नवा चित्रपट ‘इंदु की जवानी’चा ट्रेलरही नुकताच प्रसारित करण्यात आला असून हा चित्रपटही लवकरच ओटीटीवर दाखवला जाणार आहे. आशुतोषच्या या चित्रपटाचे नाव सध्या ‘कर्रम कुर्रम’ असे ठेवण्यात आले आहे.

लिज्जत पापडाची सुरुवात 1959 मध्ये मुंबईत राहाणाऱ्या जसवंतीबेन पोपट, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडानी, उजामबेन कुंडलिया, बानुबेन तन्ना, सी गवाड़े आणि लागूबेन गोकानी यांनी घराला आर्थिक मदत व्हावी म्हणून केली होती. तेव्हा दिवसाला पापडाची चार पाकिेटे तयार केली जात असे आणि आज त्यांच्याकडे 50 हजारच्या आसपास महिला पापड बनवण्याचे काम करीत असून कोट्यावधींचा टर्नओव्हर होत आहे.

विशेष म्हणजे लिज्जत पापडचे साम्राज्य उभारणाऱ्या संस्थापकांची कथा आशुतोषच्या सहाय्यकांनीच त्याला सुचवली होती. त्याला कथा आवडल्यानंतर त्याने काम सुरु केले आणि आता चित्रपटाची पटकथाही लिहून पूर्ण केली आहे. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER