निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा बैठकांवर बहिष्कार

- मोदी आणि अमित शहांना क्लीन चिट देण्याला होता विरोध

ashok-lavasa

नवी दिल्ली : काल संपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक वेळा आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागोपाठ क्लीन चिट मिळाल्याने अत्यंत नाराज झालेले निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आयोगाच्या आचारसंहिता बैठकांवर बहिष्कार टाकला आहे.

निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. आयोगाची तीन सदस्यीय समिती आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामध्ये असहमती आणि विरोध केलेल्या मुद्यांचा समावेश केला जात नसल्याने निवडणूक आयुक्त अशोक लवासा नाराज आहेत. त्यामुळे ४ मेपासून होत असलेल्या आचारसंहितेच्या मुद्यावरून होत असलेल्या सर्व बैठकांवर आयुक्त अशोक लवासा यांनी बहिष्कार टाकला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आचारसंहितेबाबत निवडणूक आयोगाच्या होणाऱ्या बैठकीमध्ये जोपर्यंत असहमती आणि विरोध केलेल्या निर्णयाचा आदेशामध्ये समावेश केला जात नाहीत तोपर्यंत   बैठकीत भाग न घेण्याचा निर्णय लवासा यांनी घेतला आहे.

आचारसंहिता उल्लंघन प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना एकाही प्रकरणात साधी नोटीसही पाठविण्यात आली नाही. मोदींना तर सलग आठ प्रकरणांत क्लीन चिट देण्यात आली. यामुळे लवासा अत्यंत नाराज होते, अशी माहिती आहे. त्यांनी काही निर्णयांवर असहमती, तर काही प्रकरणांत थेट विरोध केला होता. मोदी-शहांना नोटीस पाठविण्यात यावी, असे लवासा यांचे आग्रही मत होते.

मोदींच्या महाराष्ट्रातील वर्धा आणि नांदेडमधील झालेल्या सभेमध्ये दिलेल्या भाषणाला निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली होती. याचा लवासांनी विरोध केला होता. त्यानंतर लातूर आणि चित्रदुर्गमध्ये झालेल्या सभेमध्ये मोदींनी बालाकोट आणि पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला होता. याबाबतही त्यांना क्लीन चिट देण्यात आली.

त्यानंतर नागपूरमध्ये झालेल्या सभेमध्येही मोदींनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यातही मोदींना क्लीन चिट देण्यात आली. या सर्व प्रकरणांत  २:१ ने निर्णय देण्यात आला. तीन सदस्यीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा, सुशील चंद्रा आणि अशोक लवासा यांचा समावेश आहे.