अशोक चव्हाणांची विनोद तावडेंना काँग्रेसमध्ये येण्याची खुल्ली ‘ऑफर’

Ashok Chavan-Vinod Tawade

मुंबई : भाजपाने राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना तिकीट नाकारले. यामुळे त्यांची सर्वत्र थट्टा केली जात आहे. सोशल मीडियावरही याची चांगलीच चर्चा आहे. यावरुनच आता काँग्रसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तावडेंना काँग्रेसमध्ये येण्याची खुल्ली ऑफर दिली आहे. ताडवेंसोबत नियतीनेच विनोद केल्याचा टोला लगावत त्यांनी काँग्रेसमध्ये यावे मी त्यांना तिकीट देतो अशी चपकार चव्हाण यांनी लगावली आहे.

विनोद तावडे यांचे नाव भाजपाच्या चौथ्या शेवटच्या यादीतही न आल्याने ते निवडणूक लढणार नाही हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल असे स्पष्ट मत तावडेंनी व्यक्त केले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये चव्हाणांचा पराभव झाल्यानंतर चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये असा सल्ला तावडेंनी दिला होता. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात तावडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यावरून चव्हाण यांना राजकीय सल्ला देत टीका केली होती. “लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” असा सल्ला देत “राज्यातील कुठल्याही मतदारसंघात चव्हाण उभे राहिले तरी हरतील, अशी टीका तावडे यांनी केली. याचवरुन आता चव्हाणांनी परतफेड करत तावडे यांना खडे बोल सुनावले आहेत. ‘तावडेंसोबत नियतीनेच विनोद केला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये यावे मी त्यांना तिकीट देईल,’ असे चव्हाण म्हणाले. सध्या भजापाचे बोरवलीमधील आमदार असणाऱ्या तावडेंऐवजी यावेळी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे.

याआधीही चव्हाणांनी ट्विटरवरुन तावडेंवर निशाणा साधला होता. “मी निवडणूक लढवावी की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण माझ्याविरोधात त्यांना निष्ठावंत मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो. याची तावडेंनी अधिक काळजी केली पाहिजे,” असे चव्हाण ट्विट करुन म्हणाले होते.

आता तर थेट अशोक चव्हाणांची विनोद तावडेंना थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर केली आहे. आमच्याकडे भेदभाव होणार नाही असेही चव्हाणांनी तावडेंना टोला हाणला.