मराठा आरक्षण कायदा इतका फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही? चव्हाणांचा सवाल

Ashok chavhan & Devendra Fadnavis

मुंबई : दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाची आज वादळी सांगता झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून यंदाचे अधिवेशन चांगलेच गाजले. त्यातच मराठा आरक्षण समन्वय समितीचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मराठा आरक्षणाबाबत वारंवार प्रश्न उठत असतात, आज चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच उलट प्रश्न केला आहे. मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ आहे. या कायद्याला कोणताही अडथळा येणार नाही, असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. हा कायदा इतका फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी फडणवीस यांना केला. (Ashok Chavan slams devendra fadnavis on maratha reservation)

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर सुरू असलेल्या चर्चेत भाग घेताना अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा सवाल केला. फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी फुलप्रुफ कायदा आणू म्हणून सांगितलं होतं. या कायद्यामुळे काहीच अडचण येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. तुमचा कायदा एवढाच फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात तो टिकला का नाही? असा सवाल करतानाच आम्ही तर तुम्ही आणलेला आरक्षण कायदा मान्य केला. त्यावर चर्चाही केली नाही आणि आक्षेपही घेतला नव्हता, असं चव्हाण म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेलेच वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. एकूण नऊ ते दहा निष्णांत वकील हा खटला लढवत आहेत. पण काही ना काही मुद्द्यांवर विषय अडत आहे. पण आम्हीही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. आता या प्रकरणावर कोर्टात दररोज सुनावणी होणार असून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी ओबीसींचं आरक्षण कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. ओबीसी आरक्षणाबाबत काही वेगळा विचार नाही. या आरक्षणात काही फरक पडणार नाही. पण काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानपरिषदेच्या निकालानंतर खासकरून मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER