अशोक चव्हाणांना आपल्याच गृहनगरात जबर धक्का : चार नगरसेवकांचा काँग्रेसला रामराम

नांदेड : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना त्यांच्याच गृहनगरात जबर धक्का बसला आहे. कारण नांदेड महापालिकेत सदस्य असलेल्या काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी राजीनामा देत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सरजीत सिंह गिल, स्नेहा पांढरे, किशोर यादव आणि नवल पोकर्णा अशी काँग्रेसच्या चौघा नगरसेवकांची नावे असून, किशोर यादव वगळता उर्वरित तिघांनी यापूर्वीच भाजपशी जवळीक साधल्याचे म्हटले जातं आहे.

नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या या चार नगरसेवकांनी आपला राजीनामा महापालिका आयुक्तांकडे सोपविला आहे. नांदेड महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असून सध्या पालिकेत काँग्रेसचे ४१ नगरसेवक आहेत. तर भाजपचे २ नगरसेवक निवडून आले होते. येत्या काही दिवसात एखाद मुहूर्त साधून चारही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.