राणेंच्या घरवापसीवर अशोक चव्हाण म्हणाले, अजून त्यांचा प्रस्ताव आला नाही

narayan

मुंबई :- भाजपचे मदतीने खासदार झालेले महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे भाजपकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने भाजपवर नाराज आहेत. त्यात भर म्हणून भाजप आणि शिवसेनेच्या युतीची शक्यता कमालीची ताणल्या जात असल्याने राणेंची काळजी वाढली आहे. त्यामुळे राणेंची पुन्हा घरवापसी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान नारायण राणे यांच्याकडून असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. भाजपची शिवसेनेबरोबर युती झाली तर भाजप राणेंचा पत्ता कट करण्याची शक्यता असल्यामुळे राणेंना काँग्रेस आघाडीच्या कोट्यातील रत्नागिरी लोकसभा जागा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची माहितीही व्यक्त करण्यात येत होती.

शरद पवार काही दिवसांपूर्वी कोकणच्या दौऱ्यावर असताना राणेंच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे राणे राष्ट्रवादीत जाणार का अशीही चर्चा होती. मात्र सध्या तरी नारायण राणे हे भाजपसोबत आहेत. त्यांनी आधी भाजपची साथ सोडावी. त्यानंतर त्यांना सोबत घेण्याबाबत विचार करू,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलली आहेत. कारण आघाडीत हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याची चर्चा आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी पक्षाच्या विविध समित्यांची घोषणा केली. त्यात भाजपचे संकल्प पत्र तयार करणाऱ्या समितीमध्ये नारायण राणे यांचेही नाव आहे.

संकल्प पत्र अर्थात निवडणुकीसाठीचा जाहीरनामा हा कुठल्याही पक्षाचा जाहीरनामा हा अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट समजल्या जाते. या समितीत ज्येष्ठ नेत्यांचा समावेश केला जातो. समितीत राणे यांना स्थान देऊन भाजपने त्यांच्या बद्दल आदर दाखविल्याचे बोलले जाते. तर अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाही इशारा देण्याचे कामही यातून भाजपने केले असल्याचे संकेत होते. तरीसुद्धा नारायण राणे नाराज असल्याचे समजते.