अशोक चव्हाण कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईकडे रवाना

Ashok Chavan

मुंबई : कोरोनाने राज्यात उद्रेक केला आहे. कोरोना आता थेट मंत्र्यांच्या दारात पोहचला आहे. महाविकास आघाडीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

अशोक चव्हाण हे लॉकडाऊनच्या काळात दोन महिने नांदेडमध्येच होते. मात्र मध्यंतरी विधानपरिषद निवडणुकीसाठी ते मुंबईला गेले होते. या निवडणुकीनंतर ते नांदेडला घरी परतले. त्यानंतर ते खबरदारी म्हणून स्वतः होम क्वारंटाईन झाले. त्यांनी कुटुंबापासून स्वत:ला वेगळं ठेवलं होतं. या दरम्यान नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रिपोर्टनंतर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्येच उपचार घेण्यास सुरुवात केली. परंतु आज ते उपचारासाठी नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

रस्तामार्गे १२ तासांचा प्रवास करून ते मुंबईत पोहचतील. दरम्यान अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईकडे रवाना होताना त्यांनी उपस्थितांना हात दाखवून आपण ठीक असल्याचं सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER