संविधानाच्या चौकटीबाहेर काम करायचं नाही, हे शिवसेनेकडून लिहून घेतलं; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray-Ashok Chavan

नांदेड : संविधानाच्या चौकटीत राहून या सरकारने काम केले पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडू अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेत त्यांनी लिहून दिल. त्यामुळे हे सरकार स्थापन झालं, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाला शिवसेनेला घेरण्यासाठी संधी मिळाली आहे.

यावेळी चव्हाण म्हणाले की, राजकारण आणि चित्रपट-नाटक क्षेत्र जवळपास सारखेच आहेत. आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्र सारखचं असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असं वाटत नव्हतं. पण आम्ही एकत्र आलो, हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे, तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचं सरकार आलं, असं मिश्किल वक्तव्यही त्यांनी केलं.

तीन पक्षांचं सरकार म्हणजे तीन विचारांचं सरकार, हे सरकार चालणार कसं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दिल्लीमध्ये आमच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो. त्यांनी परवानगी देण्यास नकार दिला. रोज भांडणं होतील. रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालणार कसं? आम्ही सांगितलं, चिंता करु नका. मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. त्यात अजून एका पक्षाची भर होईल. त्यात चिंता करायचं कारण नाही’, असं अशोक चव्हाण म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांच्या या फोटोवरून मनसेची ठाकरे सरकारवर टीका