शिवसेनेला गोंजारण्यासाठी बाळासाहेबांच्या स्मारकाला निधी दिला – अशोक चव्हाण

Ashok Chavan

रत्नागिरी :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाठी राज्य सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आणि यावरून काँग्रेसने शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला खरेदी करण्याचे तंत्र अवलंबले आहे, ते योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. बाळासाहेबांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला जाणार आहे. बाळासाहेबांची (२३) जानेवारीला ९३ वी जयंती आहे. त्याच्या एक दिवसापूर्वी फडणवीस सरकारने स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. ‘स्मारकासाठी दिलेले पैसे म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यव आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला खरेदी करण्याचे तंत्र अवलंबले आहे. आम्ही राजकीय विरोधक असलो, तरी बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदरच आहे.’ असेही चव्हाण यावेळी म्हणाले.