
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . हे पाहता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यापाठोपाठ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही 18 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्याची मागणी केली आहे. 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तिने लस (coronavirus-vaccine) मागितली तर त्याला लस देण्यात यावी, त्यासाठी वयाची अट शिथिल करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
कोरोनाच्या नव्या लाटेत तरुणांमध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यामुळे आता केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा 45 वर्षांवरील नागरिक अशी मर्यादा न ठेवता 18 वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येकासाठी मागेल त्याला लस देण्याचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला लस देण्याची परवानगी असावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लस उत्पादकांशी चर्चा करून त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करावी आणि सुरूवातीला महाराष्ट्रासारख्या अतिबाधीत राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेसाठी अधिकाधिक लसींची उपलब्धता करून द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला