तिजोरीचा नुसता खडखडाट, कारभाऱ्यांचा बाजीरावाचा थाट!

- मनपाच्या अर्थसंकल्पावर आशिष शेलारांचा टोमणा

मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प (Budget) जाहीर करण्यात आला. महापालिकेने यंदा ३९ हजार ३८ कोटींचे बजेट जाहीर केले. मागील वर्षी मुंबई महापालिकेचे बजेट ३३ हजार ४४१ कोटींचे होते, यंदा १६. ७४ टक्क्यांनी बजेट वाढवले आहे. या अर्थसंकल्पावरून भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लागोपाठ चार ट्विट्स करुन टीका केली आहे.

शेलार म्हणालेत, मुंबईचे कारभारी बुलेट ट्रेनला विरोध करतात, त्यांनी मेट्रो कारशेडचा खेळखंडोबा करुन ठेवला आहे, मुंबईचे कारभारी प्रत्येक नव्या प्रकल्पांना विरोध करतात, तर दुसऱ्या बाजूला पालिका म्हणते, आम्ही मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा देणार. चौकांचे आणि उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण म्हणजे जागतिक दर्जाच्या सुविधा असतात काय? असा खोचक प्रश्न शेलारांनी केला आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये शेलारांनी म्हटले आहे की, “मुंबई महापालिका, कमी व्याजावर ७७ हजार कोटींच्या ठेवी बँकेत ठेवून बँकाना पैसा वापरायला देते. दुसरीकडे कर्ज काढून चढ्या दराने व्याज भरते, एकीकडे महसूलात घट होत असून कर्ज घेणार असे सांगितले जाते तर दुसरीकडे महापालिका म्हणते अर्थसंकल्पाचे आकारमान १६. ७४ टक्के वाढणार. महापालिकेचा ताळमेल फसला आहे आणि बजेटच्या वेळी केवळ आकड्यांचा खेळ पाहायला मिळाला.”

करात वाढ नसली तरी शुल्क आकार सुधारणा प्राधिकरण घोषित करून शुल्क वाढीच्या नावाने खिसा कापण्याचे सूतोवाच आहेच.

समुद्राचे पाणी गोड करणे, वरळी डेरीवर जागतिक पर्यटन केंद्र उभारणे, हे सारे पाहिले की हा पालिकेचा अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र, असा टोमणा शेलारांनी मारला.

या अर्थसंकल्पात उल्लेखनीय असे काही नाही, असे सूचित करताना शेलार यांनी कारभाऱ्यांची कोणतीही चमकदार कामगिरी नसलेला अर्थसंकल्प, आहि टीका केली. ट्विटमध्ये ते महललेत, धनदांडग्यांना केलेल्या सवलतींच्या वर्षावामुळे ५ हजार ८६७ कोटी महसूलात घट असलेला.. पालिकेला ५ हजार ८७६ कोटींने कर्जबाजारी करणारा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे.. रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट कारभाऱ्यांचा उगाच बाजीरावांचा थाट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER