जाता जाता आशिष शेलार पवारांना म्हणाले ‘नंतर फोन करतो’

Sharad Pawar & Ashish Shelar

मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आगपाखड करतांना दिसून येतात. मात्र काही ठिकाणी राजकीय वैर बाजूला ठेवून एकमेकांशी आपुलकीने बोलणेही विसरत नाही याची प्रचिती बुधवारी विधानभवनात दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात गेले होते. तर भाजपाचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार अधिवेशनानिमित्त विधानभवन परिसरातच होते. यावेळी आशिष शेलार आणि शरद पवार यांची आज भेट झाली. विधानभवनच्या पायऱ्यांवर दोघे एकमेकांना भेटले.

मनसे- भाजपा युती, भाजपा बाळा नांदगावकर यांना विधानपरिषदेत पाठवणार?

यावेळी आशिष शेलार आणि शरद पवारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवरच चर्चा झाली. दोघांनी एकमेकांशी उभ्या उभ्याच हसत-खेळत बातचीत केली. दोघांभोवती कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. यावेळी पवारांनी आधारासाठी शेलारांचा हात पकडल्याचं दिसलं. तर शेलारही हसत हसत पवारांना काहीतरी सांगत होते. यादरम्यान गर्दीच्या आवाजामुळे पवारांना शेलारांचं आवाज नीट ऐकू येत नव्हता. शिवाय गर्दीही वाढत होती. त्यामुळे नेमकं कोण-काय बोलतंय हेच समजत नव्हतं. त्यामुळे जाता जाता आशिष शेलारांनी पवारांना ‘मी नंतर फोन करतो’, असं सांगितलं आणि दोघेही पुढे गेले