सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची ‘हीच ती वेळ’ – आशिष शेलार

Ashish Shelar

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. मात्र मंडळाने घेतलेल्या निर्णयावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संकटवेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरत असते. शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा करता येऊ शकतो. मग गणेशभक्त आणि राजाची ताटातूट का? असा प्रश्न उपस्थित करत शेलार यांनी ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळाने गणेशमूर्ती स्थापन न करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा:- लालबागच्या राजाने गणेशोत्सवाची परंपरा अखंडीत ठेवावी; मुंबई महापालिकेचे मंडळाला पत्र

“सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत सापडला आहे; पण बाप्पा मार्ग काढेल! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी मूर्तीची उंची कमी करून, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार आहेत, त्यांचे कौतुकच.” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. “लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबवण्याचा घेतलेला निर्णय “स्तुत्यच”… पण मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाएकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ” अशी अपेक्षा आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

“संकट मोठे आहे, अशा वेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाईन दर्शनसुद्धा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते! या देशात श्रद्धेला मोल नाही. श्रद्धा तोलूनही पाहता येत नाही. म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?” असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER