..म्हणून आघाडीचे नेते भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारतात – आशिष शेलार

ashish-shelar1

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर भाजपला मोठा जबर धक्का बसणार असल्याच्या बातम्या सध्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. राज्यसभा खासदारासह काही आमदार भाजपला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त सध्या दिसून येत आहे. मात्र आपल्यासोबत आलेल्या अपक्ष आमदारांना आश्वासने देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस उलटले तरी साधे खातेवाटही करू शकले नाही.

दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारणे सुरू झाले आहे. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशा शब्दांत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

भाजपतील डझनभर आमदार फुटणार ही निव्वळ अफवा आहे. तिघाडीच्या नेत्यांकडून अशा खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. चोराच्या उलट्या बोंबा मारणे सुरू झाले आहे. भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेले असो वा मूळ भाजपचे असलेले आमदार सर्व पक्षशिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केले त्यामुळेच आश्वासक, प्रभावी, पारदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेवून अन्य पक्षातून अनेक आमदार भाजपमध्ये आल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

दरम्यान, सत्तास्थापनेच्या काळात भाजपला या सर्व आमदारांवर विश्वास असल्यानेच त्यांना तिघाडीच्या आमदारांप्रमाणे हॉटेलमध्ये डांबून ठेवावे लागले नाही. कुणीही कुठल्याही प्रकारे पक्षशिस्त मोडली नाही. तिन्ही पक्षांनी आमदारांना डांबून ठेवले. मोठमोठी आश्वासनं दिली. प्रत्यक्ष आता काहीच घडत नाही. त्यामुळे त्यांच्याच आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सध्या तिघाडीचे जे सुरू आहे ते पाहून भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेले आमदार म्हणत आहेत की, बरे झाले आम्ही भाजपत दाखल झालो, असंही शेलार यावेळी म्हणाले.