‘अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे मेट्रो कारनामे’, आशिष शेलारांचे मुख्यमंत्र्यांवर टीका

Ashish Shelar & Uddhav Thackeray

मुंबई : आरेतील मेट्रो कारशेड (Metro Carshed) प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. त्यानंतर कांजूरमार्गच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाची जागा केंद्राची असल्याचा दावा करण्यात आला होता. तर राज्य सरकारकडून ही जागा आपल्याच मालकीची असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे पुन्हा एका तिसऱ्या व्यक्तीने या जागेवर दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे.

‘गारोडिया समूहाचे महेशकुमार गरोडिया यांनी एमएमआरडीएला नोटीस बजावून कांजूर खेड्यातील ५०० एकर जागेची आपण भाडेपट्टी केली आहे. त्यामुळे काम थांबवा. तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रो कारशेडसाठी दिलेल्या १०० एकर जमीनीचा आदेश मागे घ्या, अशी नोटीस बजावली आहे’.

‘मुंबई सीटी सिव्हिल कोर्टाने १६ एप्रिल २०१६ला या जागेबाबत जैसेथे परिस्थिती ठेवा असे आदेश दिले, असा दावाही गारोडीयांनी केलाय. इंच इंच जमीन महाराष्ट्राची, असे सांगणारे आता गारोडीयाच्या “सातबारा” आडून भूखंडाचा श्रीखंड तर खाणार नाही ना? भूसंपादनच्या नोटीसची वाट तर बघत नाही ना?’, असा सवाल आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे.

‘कांजुरमार्गच्या जागेचा निर्णय घेताय तेव्हाच भविष्यातील जागा हस्तांतरणातील 50 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी करताय? असा सवाल त्याचवेळी आम्ही केला. तेच खरे ठरतेय. पेटवायची अस्मिता, खायची मालमत्ता? मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा “मेट्रो कारनामे’, अशा शब्दात आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER