लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे हीच ठाकरे सरकारची कार्यपद्धती – आशिष शेलार

Thackeray-Shelar

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राच्या अधिकारात असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे हीच ठाकरे सरकारची कार्यपद्धती असल्याचा घणाघात आशिष शेलारांनी (Ashish Shelar) केला आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी आरेऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा निर्णय केला. त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं, राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसतोय. घोषणा झाली तेव्हाच प्रतिक्रिया देताना आम्ही स्पष्ट म्हटलं होतं. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय.

आज केंद्राच्या पत्रानं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. अहंकारी प्रवृत्तीनं घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतोय. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र करत आहेत, असे त्याच दिवशी आम्ही सांगितले होते. मेट्रोच्या विकासामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. पहिल्यांदा लटकवणे, अडकवणे, जागा ट्रान्सफर करताना ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता होती, ती केलेली दिसत नाही.

अडकवणे, जनतेला भटकवणे आणि चुकीची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे, असा यांनी निर्णय घेतला आहे. मेट्रो कारशेड कांजूरला करण्याचा निर्णय घोषित झाला आहे त्याबाबत सरकारने काही खुलासे करण्याची गरज आहे. असे सांगत आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा डीपीआर झालाय आहे का? त्याचा टेक्निकल स्टडी झाला आहे का? त्याचा ऑपरेशनल प्लॅन तयार झाला आहे का? या तिन्ही गोष्टींचा अभाव असताना केवळ एक वाक्य फेकायचे आणि जनतेला भ्रमित करायचे असे चित्र आहे, असे आम्ही सांगितले होते. शून्य पैशांमध्ये जागा ही केवळ घोषणा आहे. कारण ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार म्हणते आहे, ती जागा मिठागरांची आहे, त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे ती जागा जर राज्य सरकारने आपल्या नावावर केली असेल तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होते, असं आशिष शेलार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER