मनसुख हिरेन मृत्युप्रकरण दाबण्याचे ठाकरे सरकारचे प्रयत्न; आशिष शेलार यांचा आरोप

Ashish Shelar - Mansukh Hiren - Uddhav Thackeray

मुंबई : मनुसख हिरेन (Mansukh Hiren) खूनप्रकरणावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. या प्रकरणी भाजपा (BJP) आक्रमक असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सचिन वझेंना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी केली. या संदर्भात भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हेदेखील माध्यमांशी बोललेत. त्यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) आरोप केला – “मनसुख हिरेन प्रकरणाची योग्य चौकशी न करता हे प्रकरण दाबण्याचे काम ठाकरे सरकारकडून सुरू आहे!” या प्रकरणात “कोथमिरे नावाचे अधिकारी कोण आहेत? कोथमिरे आणि सचिन वझे यांचा संबंध काय? त्यांचे मुंबईचे बॉस कोण आहेत? मनसुख हिरेन खूनप्रकरणी सचिन वझेंना का सरकार वाचवतेय?” असे प्रश्न शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारलेत.

आशिष शेलार म्हणाले, “मनसुख हिरेन खूनप्रकरणामध्ये ज्या पद्धतीने चौकशी होणे अपेक्षित आहे. त्याच्या विपरीत चौकशी दाबण्यासाठीचे प्रयत्न ठाकरे सरकारकडून चालले असे दिसत आहे. जो सचिन वझे या प्रकरणातील गुन्हे शाखेमधील अधिकारी, त्याच्याबद्दल मनसुख हिरेनच्या पत्नीने जबाबात – त्यांची गाडी सचिन वझेकडे होती असे म्हटले आहे. सचिन वझे मनसुख हिरेनशी वारंवार बोलत होते हे सांगितले आहे. त्या प्रकरणात मनसुख हिरेन यांनी अटकपूर्ण जामीन घ्यावा, असेदेखील सचिन वझे म्हणतात, असे हिरेन यांच्या पत्नीने सांगितले आहे. सचिन वझे यांच्या या सर्व हालचाली पाहिल्या तर असे लक्षात येते की, ज्यावेळी हिरेन यांचे शव सापडले त्यानंतर शवविच्छेदनालादेखील सचिन वझे हजर होते. खरे तर ठाणे हे त्यांचे कार्यक्षेत्र नाही, त्यांनी तिथे जाणे अपेक्षित नाही.

खुनाची केस एटीएसकडे दिली गेली होती. तरी सचिन वझे तिथे पोहचले! याचा अर्थ सचिन वझे या प्रकरणातील सर्व पुराव्यांशी छेडछाड करत आहेत किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सचिन वझे यांच्यावरील कारवाई अपेक्षित आहे. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) सचिन वझेवर (Sachin Vaze) कारवाई करण्याबाबत उत्तर देत नाही. कारण, सचिन वझेचे शिवसेनेशी संबंध आहेत. आधी ते शिवसेनेशी संबंधित होते. म्हणून यामागेदेखील कुणाचा राजकीय हात आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. सचिन वझेवर कारवाई केल्यानंतर यामागची कुठली गँग अजून  व्यवस्थेत असेल, तर ती समोर येणार आहे.

अशा पद्धतीने गुन्हे करणारी एक टोळी व्यवस्थेमध्येच कार्यरत आहे. म्हणून आम्ही सभागृहातदेखील सरकारला प्रश्न विचारला. हे कोथमिरे नावाचे अधिकारी कोण आहेत? कोथमिरे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? हिरेन खूनप्रकरणात सचिन वझेंसोबत कोथमिरे आहेत का? त्यांचे बॉस कोण आहेत?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER