सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर भाजपचं लक्ष – शेलार

ashish-shelar-after-bjp-meeting-mumbai-devendra-fadnavis

‘देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है’ , उद्यापासून ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून शहरी भागातील आमदार तसेच विधान परिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहेत.


मुंबई : गेली ३० वर्षे भाजप-शिवसेनेची युती राहिली. मात्र, यंदा युतीत लढूनदेखील स्पष्ट कौल असताना युती सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरली. सत्तेच्या वाटाघाटीवरून युतीपक्ष शिवसेनेने आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता शिवसेना विरोधी पक्ष, विरुद्ध विचारसरणीचे पक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. या त्रिसूत्रीला महाशिवआघाडी असे नाव देण्यात आले आहे.

या आघाडीवर भाजप बारीक लक्ष ठेवून असल्याचे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर आशिष शेलार माध्यमांशी बोलत होते. शेलार म्हणाले की, आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच आहेत.

तसेच राज्यात चाललेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. आज प्रथमच भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीला नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, गणेश नाईक, कालिदास कोळंबकर प्रथमच भाजपच्या कमळावर निवडून आलेल्या आमदारांसह भाजपचे सर्व आमदार आणि पाठिंबा दिलेले तसेच मित्रपक्षांचे आमदारदेखील उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच ‘देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या बैठकीत राजकीय सद्य:स्थितीवर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांशी चर्चा केली. शेलार म्हणाले की, राज्यभरात ९० हजार बुथवर संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच उद्यापासून ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून शहरी भागातील आमदार तसेच विधान परिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहेत, असे शेलार यांनी सांगितले.