आशय सांगतोय … मुलींनो विचार करा

Ashay Kulkarni

सगळा स्वयंपाक बनवता येणारा मुलगा असेल तर त्याच्याशी लग्न करायला प्रत्येक मुलीला आवडेल. सध्या मुलींच्या नवऱ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्यामध्ये ही अपेक्षा अगदी वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुलांना स्वयंपाक बनवता येणे हा मुलींना पटवण्यासाठी एक हुकुमाचा एक्का झाला झाला आहे. लॉकडाऊनमध्ये (Lockdown) नवऱ्यांनी किचनचा ताबा घेतला होता. त्यामुळे लग्नानंतर दमून भागून आलेल्या बायकोला नवऱ्याकडून गरमागरम जेवण बनवलेले ताट मिळालं तर सोने पे सुहागा. माझा होशील ना या मालिकेत सुयश म्हणजेच आशय कुलकर्णी (Ashay Kulkarni) यानेदेखील मुलींसमोर हाच हुकुमाचा एक्का टाकला आहे. आशय कुलकर्णी हा उत्तम जेवण बनवतो. इतकंच नव्हे तर आशयला अप्रतिम भाकऱ्या करता येतात.

पहिल्याच मालिकेत खलनायक साकारूनही आशयच्या फॅन फॉलोइंग मध्ये मुलींची संख्या जास्त आहे. मालिकेतल्या सईने जरी माझ्याबरोबर लग्नाला नकार दिला असला तरी मी उत्तम खूप कुक असल्याने प्रेक्षकांमधील मुलींनी नक्की माझा विचार करायला हरकत नाही असं म्हणत आशयने त्याच्या पाककौशल्यचा दाखलाच दिला आहे.

माझा होशील ना या मालिकेतून डॉ. सुयश ही भूमिका साकारणारा अक्षय कुलकर्णी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. खरेतर इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अभिनयाचं वेड त्याला स्वस्थ बसू देईना. पुण्यातील वेगवेगळ्या नाटकांच्या ग्रुपमध्ये तो सहभागी झाला आणि त्याने अनेक प्रायोगिक नाटकं तसेच एकांकिका यामध्ये काम करायला सुरुवात केली. माझा होशील ना या मालिकेतील स्क्रीनवरचा त्याचा पक्का दुश्मन म्हणजेच आदित्यची भूमिका साकारणारा विराजस कुलकर्णी हा त्याच्या नाटकाच्या ग्रुपमधला सच्चा मित्र आहे. या दोघांच्या ऑफस्क्रीन धमालीचे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर पोस्ट होत असतात. मालिकेत मात्र हे दोघे एकमेकांवर खार खाऊन असताना दाखविण्यात आले असले तरी सेटवर या दोघांची धमाल-मस्ती सुरु असायची. सध्या आदित्य आणि सई यांचं लग्न झाल्यामुळे सुयशचे सगळेच डावपेच फोल ठरले आहेत. या मालिकेतून त्याची एक्झिट होते न होते तोवरच पाहिले न मी तुला या नव्या मालिकेतून आशय प्रेक्षकांसमोर येत आहे.

आशय सांगतो , खरं तर माझा होशील ना या मालिकेत माझी खलनायकची भूमिका होती आणि पाहिले न मी तुला या माझ्या नव्या मालिकेत मी एकदम गुड बॉय साकारणार आहे. त्यामुळे आधीच्या मालिकेतील माझ्याविषयीचे सगळे गैरसमज दूर करून माझ्याकडे बघण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलण्याचं आव्हान नक्कीच अभिनेता म्हणून माझ्यासमोर आहे. सध्या माझ्या नव्या मालिकेचे प्रोमो झळकत आहेत. एक मार्चपासून ही मालिका सुरू होणार आहे. नुकतच या मालिकेचं शूटिंग सुरू झाला आहे त्यामुळे मला खूप उत्सुकता आहे. माझा होशील ना ही मालिका करत असताना मला असे अनेक मेसेज यायचे की मी सई आणि आदित्य यांच्या प्रेमात का खो घालतोय . पण माझा रोल तसाच होता आणि मी इमाने-इतबारे माझा रोल केला. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतेय की त्या मालिकेमध्ये मला वाईट दाखवण्यात आले असूनसुद्धा अनेक मुलींकडून मेसेज यायचे. त्याच्यामध्ये मुलींनी मला प्रपोज देखील केलं होतं.

आशयच्या अनेक कलागुणांपैकीच एक गुण म्हणजे तो पाककलेत अतिशय निपुण आहे. त्याला कुठलेही पदार्थ चांगले करायला येतात. याचे श्रेय तो आईला देतो. लहानपणी आई सोबत स्वयंपाकघरात घुटमळत असताना आई काय करते हे मी पहायचो. त्यातूनच आवड निर्माण झाली. एखाद्या घरातील स्त्री ज्या पद्धतीने सगळे पदार्थ बनते तसे सगळे पदार्थ मला बनवता येतात. अनेक पुरुषांना घरच्या घरी स्वयंपाक करता येत असतो पण चपाती आणि भाकरी म्हटलं की त्यांचे एक पाऊल मागे असतं. या बाबतीत मी तेही शिकून घेतलं आहे आणि माझी भाकरी व चपाती छान होते. त्यामुळे कदाचित ही गोष्ट मी शेअर केल्यामुळे अनेक मुलींनी मला प्रपोजल टाकली असतील. मलादेखील अशा मुलींना हेच सांगायचं की मला चपाती भाकरी उत्तम करता येते आणि माझ्यासोबत जी मुलगी लग्न करेल तिचा नक्कीच फायदाच फायदा आहे.

आशयने खूप छोट्या-छोट्या भूमिका करत अभिनयातील त्याचं स्थान बळकट केले आहे. त्याची काय बाय या सिनेमातील भूमिका विशेष गाजली होती. तसेच वेगवेगळ्या एकांकिका आणि नाटकांमध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिकेही मिळालेली आहेत. मालिकेत काम करण्यासाठी त्याने पुण्याहून मुंबईकडे आपला मोर्चा वळवला आणि माझा होशील ना या मालिकेत खलनायक बनून त्याने अनेकांचे प्रेम जिंकलं. आता लवकरच तो पाहिले न मी तुला या मालिकेत दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER