आशालताबाईंचे निधन आणि विवेकबुद्धीची गरज

Alka Kubal Ashaltabai

Shailendra Paranjapeतहान लागली की विहीर खणायची, हा आपल्या शासन-प्रशासन व्यवस्थेतला आवडता खेळ. त्याबरोबरच बादशाहाला पोपटाने प्राण सोडलाय, हे कसं सांगायचं…त्याऐवजी पोपट कसं तरीच करतोय, पोपटाने डोळे असे वर केलेत, पोपट अस्वस्थ झालाय वगैरे सांगून एकूण परिस्थितीवरची शस्त्रक्रिया टाळून मलमपट्टी करून वेळ मारून न्यायची, हाही आपल्या व्यवस्थेतला आवडता खेळ. कारण त्यातून प्रश्न कायमचा संपत नाही तर चालू राहतो. त्या प्रश्नावर अनेकांचं उद्योगविश्वही सुरू राहतं.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री आशालता वाबगावकर (Ashalata Wabgaonkar) यांचा करोनामुळं झालेला मृत्यू आणि तदनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया. त्या  बघितल्यावर अजूनही आपण तात्कालिक आणि शक्य तो अप्रियता टाळण्याचा प्रयत्न करून प्रतिक्रिया देतो, हेच लक्षात येतंय. त्याबरोबरच अशा घटनेनंतर सुचवल्या जाणाऱ्या उपाययोजनांकडे बघितलं की भावनांवर आरूढ होऊन आणि अर्थातच विवेकाला तिलांजली देऊनच मतं व्यक्त केली जातात, हेही लक्षात येतं.

करोनामुळे (Corona) सरकारने लागू केलेले लॉकडाऊन, त्यानंतरचे अनलॉकपर्व आणि मग अर्थचक्राला गती देण्यासाठी हळू हळू सुरू केलेली काही क्षेत्रं, उद्योगधंदे, व्यवसाय…. या प्रवासात सरकारनं मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी दिली. त्यातही पुन्हा ज्येष्ठ नागरिक असलेल्या कलाकारांना चित्रीकरणासाठी परवानगी नसल्यानं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले आणि उच्च न्यायालयानं ज्येष्ठ नागरिक कलाकारांना चित्रीकरणाला परवानगी दिली.

आशालता वाबगावकर यांच्या मृत्यूनंतर मराठी चित्रपट महामंडळानं आपली भूमिका जाहीर केलीय. चित्रीकरण करताना सरकारनं घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन व्हायला हवे, ही अपेक्षा बरोबरच आहे. पण संबंधित मालिकेच्या चित्रीकरणामधे एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी  मुंबईमधून काही कलाकार आले आणि ते आल्यानंतर त्यांच्या चाचण्या केल्या गेल्या नाहीत, असंही वृत्तपत्रातून पुढे आलंय. स्थानिक हिंगणगाव ग्रामपंचायतीनंही या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी करोनाविषयक निर्बंधांचे पालन होत नसल्याने चित्रीकरण बंद करावं, अशी नोटीस दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यात.

चित्रपट-मालिका क्षेत्रातल्या कलावंत, निर्माते, दिग्दर्शक या सर्वांच्याही प्रतिक्रिया या घटनेनंतर वृत्तपत्रांनी प्रसारित केल्यात. बहुतांश कलाकार-तंत्रज्ञ हे चित्रीकरण बंद करू नये, या मताचे आहेत पण ते करताना करोनाविषयक निर्बंध कटाक्षाने पाळले जावेत, ही अपेक्षाही आहे. त्याबरोबरच शूटिंग बघायला येणाऱ्यांना प्रतिबंध करणं, याकडेही लक्ष द्यायला हवे.

चित्रीकरण बंद करणं हा उपाय खचितच योग्य नाही. त्याऐवजी करोनाचे नियम, निर्बंध न पाळणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. तसं न करता सरसकट चित्रीकरण बंद केलं गेलं तर ८२ व्या वर्षी उत्साहाने सारे नियम स्वतःपुरते पाळत चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या आशालताबाईंना किंवा ज्येष्ठ कलावंतांनी शूटिंगमधे भाग घ्यावा, यासाठी आवाज उटवणाऱ्यांनाही मान्य होणार नाही.

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आशालताबाईंबरोबरच (Alka Kubal Ashaltabai) होत्या आणि त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीही. त्यांची आशालता वाबगावकर यांच्या संदर्भातली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. त्यांनी हे स्पष्ट केलंय की चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी सर्व कलाकारांची करोना चाचणी झाली होती आणि सर्व कलाकार करोना निगेटिव्ह होते त्यामुळेच शूटिंग करण्यात आलं. मात्र, नंतर टीममधल्या २२ जणांना करोनाची लागण झाली असं आम्हाला समजलं आणि त्यापैकी जे तरुण होते ते उपचारांनतर बरे झाले, असंही अलका कुबल यांनी सांगितलंय.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितलंय की शासनाच्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले की नाही, याची प्रशासन माहिती घेत आहे.

सरकारी चौकशा, कारवाई हे सारं आपल्याला अंगवळणी पडलंय. काही तरी कारवाई नक्कीच होईल पण त्यामुळे गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी….असं गाणाऱ्या आणि पु. लं.च्या रविवारच्या सकाळमधे झल्मात असलं अळू आणलं नव्हतं हो यांनी माल्ताइ, असं म्हणणाऱ्या कडवेकर मामी अर्थात आशालता वाबगावकर थोड्याच परत येणार आहेत.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER