ॲश अण्णाची चेन्नई कसोटीवर अमीट छाप

Ashwin Ravichandran

२१ व्या शतकातील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) पुन्हा एकदा स्वत: ला सिध्द केले आहे. २६२६ धावा आणि ३९२ विकेट, पाच शतकं आणि २९ वेळा डावात ५ बळी ही कामगिरी त्याचे अष्टपैलुत्व दाखवून देणारीच आहे पण आपल्या अष्टपैलुत्वाने सामना जिंकून देण्याची क्षमता आपल्या मनगटात असल्याचे त्याने इंग्लंडविरुध्दच्या (India vs England) चेन्नई (Chennai) कसोटीत दाखवून दिले आहे.

इंग्लंडला १३४ धावांत गुंडाळताना त्याने एकट्याने पाहुण्यांचा निम्मा संघ गारद केलेला होता आणि आता तळाकडे आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने १०६ धावांची शतकी खेळी केली आहे. ६ बाद १०६ वरुन भारताची दुसऱ्या डावात धावसंख्या २८६ पर्यंत पोहोचली ती त्यामुळेच.

एकाच कसोटीत शतकही आणि डावात पाच बळीसुद्धा ही काही नेहमी नेहमी होणारी कामगिरी नाही. केवळ सहाच खेळाडूंना अशा अष्टपैलुत्वाने सामन्यावर आपली अमीट छाप सोडता आली आहे. त्यात केवळ इयान बोथमच आता अॅश अण्णाच्या पुढे आहे. इयान बोथमने कसोटी सामन्यांमध्ये पाच वेळा अशी कामगिरी केली आहे तर ॲश अण्णाने तीन वेळा. जेकस कॅलिस, मुश्ताक मोहम्मद, शकिब अल हसन व गॅरी सोबर्स यांच्या नावावर दोन वेळा.ॲश अण्णाने २०११ व २०१६ मध्ये विंडीजविरुध्द अशी कामगिरी बजावल्यावर आता आपले घरचे मैदान गाजवले आहे. त्याच्याआधी कसोटी सामन्यावर अशी अष्टपैलू छाप सोडणारे केवळ दोन भारतीय. पहिले विनू मांकड (१९५२ विरुध्द इंग्लंड) आणि दुसरे पॉली उम्रीगर (१९६२ विरुध्द वेस्ट इंडीज)

ॲश अण्णाचे विंडीज संघावर जरा जास्तच प्रेम आहे. त्याची आधीची चारही शतकं त्यांच्याविरुध्दच होती आणि आधीची दोन्ही वेळची शतकं व डावातील पाच बळींची कामगिरी विंडीजविरुध्दच होती. त्यामुळे ॲशचा खेळ केवळ विंडीजविरुध्दच बहरतो की काय अशी चर्चा व्हायची पण आता त्याला इंग्रजही आवडू लागले आहेत असे दिसते.

बोथमशी अश्वीनची आणखी एक तुलना म्हणजे कसोटी सामन्यांमध्ये किमान पाच शतकं आणि किमान २५ वेळा डावात पाच किंवा अधिक बळी घेणारे हे केवळ दोघंच. बोथमच्या नावावर १४ शतकं आणि २७ वेळा डावात पाच बळी आहेत तर अश्वीनने पाच शतकं आणि २९ वेळा निम्म्यापेक्षा अधीक संघ गारद केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER