कानाला खडा असाही..

shruti marathe

कलाकार हे जरी सेलिब्रिटी असले तरी त्यांना अनेकदा असे अनुभव येत असतात की त्यातून त्यांनी खूप काही बोध घेतलेला असतो. फोटो अपलोड करणे, फोटोसेशन पोस्ट करणे हा कलाकारांच्या कामाचा भाग असतो कधीकधी असे प्रसिद्ध केलेले फोटो चुकीच्या ठिकाणी वापरले जाऊ शकतात आणि त्याचा विचित्र अनुभव येतो. अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) हिला देखील अशाच अनुभवातून जावे लागले आहे. एका मुलाखतीमध्ये श्रुतीने हा किस्सा सांगितला आणि यासोबतच ती हे सांगायला विसरली नाही की जेव्हा असे काही फोटो तुम्ही सोशल पेजवर अपलोड करता तेव्हा नक्की त्या संदर्भात सुरक्षिततेचीही काळजी घ्या ही गोष्ट साधारणपणे सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट असेल.

श्रुती मराठेची पहिलीच मालिका राधा ही बावरी टीव्हीवर आली होती आणि काही दिवसच झाले होते या मालिकेचे एपिसोड सुरु होऊन. दरम्यान तिने काही फोटो फेसबुकवर शेअर केले होते. काही दिवसांनी श्रुतीला तिच्या चाहत्यांकडून असे मिळाले की तिचा फोटो त्यांनी काही जाहिराती मध्ये पाहिला.

सुरुवातीला तिला असं वाटलं की तिने काही जाहिराती केल्या होत्या त्याच्याबद्दल तिचे चाहते बोलत असावेत. मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये अशा पद्धतीच्या मेल वरून येणाऱ्या प्रतिक्रियांची संख्या वाढली. याबाबत श्रुती सांगते, तो अनुभव खरंच माझ्यासाठी विचित्र आणि खूप काही शिकवून जाणारा होता. एकतर मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होते. एका वृत्तपत्रांमध्ये काही जाहिराती असतात त्या जाहिरातीचा उद्देश खूप वेगळा असतो. विचित्र असतो. चांगला नसतो. आणि त्यामध्ये माझी इमेज वापरण्यात आली होती.

मराठी मालिकेत काम करण्यापूर्वी मी काही प्रादेशिक भाषांमध्ये काम केलं होतं त्यामध्ये मल्याळी तेलगू सिनेमातील काही फोटो होते आणि ते फोटो एका मुलीने तिच्या क्लासिफाईड जाहिरातीसाठी इमेज म्हणून वापरले होते. खरं तर त्या संबंधित मुलीशी माझं काहीच बोलणं झालं नव्हतं. तीने जाहिरातीत ज्या कामाचा उल्लेख केला होता ते काम चुकीचे होते आणि त्यासाठी माहिती देण्यासाठी माझा फोटो वापरल्यामुळे ते काम मी करत असेल किंवा मी ते काम करण्यास सांगत असेल असा काहीसा अर्थ त्यातून निघत होता. त्यामुळे जेव्हा मला मेल यायला लागले त्यावेळी काही जाहिराती मी काढून पाहिल्या आणि मला धक्काच बसला कारण त्यासाठी माझ्या फोटोचा वापर चुकीचा होता.

अशा प्रकारचा अनुभव पहिल्यांदाच येत असल्यामुळे सुरुवातीला श्रुती खूप घाबरली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या कामावर फार परिणाम झाला. राधा ही बावरी मालिकेच्या सेटवर देखील तिच्यामधील हा बदल अनेक कलाकारांनी पण नोटीस केला. मग मात्र श्रुतीने ही गोष्ट काही मित्रमंडळींची शेअर केली आणि त्यानंतर ज्या मुलीने श्रुती चा फोटो तिच्या चुकीच्या जाहिरातीसाठी वापरला होता तिचा पत्ता शोधून काढला आणि तिला याबाबत चांगली समज दिली. अर्थात त्या मुलीने माझ्याकडून ही गोष्ट अनावधानाने झाली असं सांगितलं असलं तरी त्याचा खूप त्रास झाला होता .श्रुतीचे असं म्हणणं आहे की खरं तर त्यावेळी मला फारसं कोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे माझा फोटो या जाहिरातीसाठी वापरताना त्या मुलीच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल. पण अशा पद्धतीने कोणाचाही फोटो वापरणे चुकीचे आहे. पण त्यापुढे जाऊन जेव्हा आपण असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतो तेव्हा आता खरी गरज आहे की आपण त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण आज मला काही माझ्या मित्रांची साथ मिळाली म्हणून मी हे प्रकरण तडीस नेऊ शकले मात्र अनेक मुली अशा चुकीच्या विळख्याला बळी पडतात आणि त्यातून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER