‘मुख्यमंत्र्यांनी सांगितले औरंगाबाद आमच्यासाठी संभाजीनगरच’, विषय संपला – संजय राऊत

Sanjay Raut-CM Thackeray

मुंबई : औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. औरंगाबादचे नामकरण राजकारणाचा नव्हे अस्मितेचा आणि लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thaceray) यांनी यापूर्वीही सांगितले आहे, की औरंगाबाद शहर आमच्यासाठी संभाजीनगर आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला इशारा दिला आहे. आजच्या सामनातून संजय राऊत यांनी औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला खडेबोल सुनावले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे विधान केले.

यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला टोले लगावले. औरंगाबादचे नामांतर हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन राजकारण होऊ नये. शिवसेना आणि काँग्रेसला आमनेसामने आणू नये, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

औरंगजेब हा क्रुर शासक होता. त्याला परधर्माविषयी प्रेम नव्हंत. तो धर्मांध होता. अशा राजाच्या नावाविषयी कुणीही आग्रही राहू नये अशी शिवसेनेची भूमिका आहे. ज्यांना औरंगजेब आणि संभाजीराजे काय आहे हे माहीत करुन घ्यायचे असेल तर आधी औरंगजेब समजून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही सांगितले आहे, की औरंगाबाद शहर आमच्यासाठी संभाजीनगर आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असे संजय राऊत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळख आहे. मात्र, आजवर देशात त्यांच्याइतका सेक्युलर राजा झाला नाही. बाबर, निजाम, औरंगजेब ही काही आपली प्रतिकं असू शकत नाहीत. हा देशाच्या आणि राज्याच्या अस्मितेचा विषय आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर 50 हून अधिक दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि आंदोलनाची एकूण धग पाहता केंद्र सरकारला कृषी कायद्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांना केंद्र सरकारलाउत्तर मागावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER