पवारांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार शतायुषी राहणार – संजय राऊत

Sharad Pawar & Sanjay Raut

मुंबई :- शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र भाजपावर शरसंधान साधलं आहे. अँजिओप्लास्टीनंतर राऊत यांना लिलावती रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर राऊत यांनी टीव्ही-9 मराठीशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निकालावर भाष्य करतानाच राऊत यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, असा दावा केला.

संजय राऊत म्हणाले, “ महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) शिल्प घडवण्याला एक वर्ष झाला. सरकार उत्तमपणे चाललं. अनेकांनी हे शिल्प तोडण्याचा प्रयत्न केला. पण ते तुटणार नाही. शरद पवार म्हणाले आहेत पाच वर्षांचा विचार कशाला पुढील २५ वर्षासाठी भूमिका ठेवली पाहिजे, मला हे योग्य वाटतं. महाविकास आघाडी शतायुषी राहील. पदवीधर मतदारसंघ, शिक्षण मतदारसंघातील मतदार विचार करून मत देणारा आहे. त्यांनी मतदानाचा कल दाखवला, तो महाराष्ट्राची दिशा दाखवणारा कल आहे. जे काल परवा सांगत होते की, या सरकारला जनमताचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा नाही. लोकांचा पाठिंबा हा कशा पद्धतीने आहे, हे काल दिसून आले. नागपूरसारख्या मतदारसंघात ४०-४५ वर्षांपासून भाजपाचा उमेदवार आहे. दुसरं कुणी लढण्याचा विचार करू नये, अशी तटबंदी आहे. नितीन गडकरी, संघाचं मुख्यालय असलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे तरुण उमेदवार वंजारी जिंकून येतात. हे कसलं लक्षण समजायचं,” असं राऊत म्हणालेत.

“पुण्यात पदवीधरची जागा भाजपाकडे होती. त्यांचे सगळे बालेकिल्ले कोसळले. अमरावतीमध्ये श्रीकांत देशपांडे शिवसेनेचे उमेदवार होते. तिथे चौरंगी लढत झाली. इतरही काही फॅक्टर होते. आम्ही सगळ्यांनी मिळून निवडणूक लढलो. एखाद दुसरी निवडणूक आम्ही हरलो. आमच्या दृष्टीने महाविकास आघाडी म्हणून बघतो. आत्मचिंतन करू. आत्मचिंतन करणं हा दोष नाही तर गुण आहे. ज्यांनी बालेकिल्ले गमावले त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. तसेही भाजपमध्ये आत्मचिंतनच्या सतत बैठका होत असतात. आम्ही कृती आणि ऍक्शनवाले आहोत. या पराभवातून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. नागपूरमधील भाजपाचा पराभव म्हणजे शिवसेनेनं लालबाग परळ गमावण्यासारखं आहे. हे आमचे बालेकिल्ले आहेत. कोणत्याही स्थितीत जिंकायला हवेत. हा पराभव देवेंद्र फडणवीसांचा आहे, असं मी म्हणणार नाही. विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे झालं असतं, तर निकाल वेगळे लागले असते. असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राहुल गांधींच्या नेतृत्वात सातत्य नाही : शरद पवार 

“मुंबई महापालिक निवडणूक असो की महाराष्ट्रातील निवडणूक, आम्ही एकत्र राहू. एकत्र राहण्याचे फायदे काल आलेल्या निवडणुकांनी दाखवून दिले आहेत. भाजपाच्या रणनितीविषयी मी कसं बोलणार. ते मास्टर्स स्ट्रेटजिस्ट आहेत. त्यांच्याकडे मोठी फौज आहे. आम्ही साधे लोक आहोत. आम्ही चर्चा करतो, निर्णय घेतो. कार्यकर्ते काम करतात. त्यांच्याकडे जागतिक यंत्रणा आहे,” असं राऊत म्हणाले.

दरम्यान, त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या विधानावरही आपले मत मांडले. राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावेव असे माझे मत आहे. काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्याय नाही. काँग्रेसला उभारी देण्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे. शरद पवारांनी केवळ आपले मत व्यक्त केले. शरद पवारांना जेवढा अनुभव आहे. कदाचित कुठल्या नेत्यांमध्ये नसावा. त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेत असतो. त्यांचे विधान मार्गदर्शन म्हणून स्वीकारावे, असेही राऊत म्हणाले. शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER