दहावीची परीक्षा रद्दच; परिस्थितीनुसार बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेऊ- शिक्षणमंत्री

Varsha Gaikwad

मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम असल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिले.

वर्षा गायकवाड यांनी आज पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या संदर्भात चर्चा करू. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनच यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका आम्ही बैठकीत मांडली.

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला सांगितलं जातं की, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख आहे.तर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या २५ हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना सुरक्षित वातावरणात केली पाहिजे. बारावीची परीक्षा महिनाभरानंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करताना लसीकरण हा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा, अशी मागणी बैठकीत मांडली.

राज्यात सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. कोरोनाची स्थिती गंभीर आहे आणि अशा परिस्थितीत परीक्षा घेणं कठीण आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मुलांवर याचा परिणाम व्हायला लागला आहे. त्यामुळे सरकारची बाजू न्यायालयासमोर मांडू. न्यायालय यासंदर्भात सहानुभूतिपूर्वक विचार करेल, अशी मला खात्री असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसंच विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच परीक्षांसंदर्भात निर्णय घेणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, अकरावी प्रवेशासंदर्भात चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे आमची प्राथमिकता आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रश्नांबाबत तज्ज्ञांची चर्चा सुरू आहे, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button