मनसेने दखल घेताच संगीतकार श्रवण राठोड यांचा मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द

MNS - Shravan Rathod

मुंबई : ९० च्या दशकात आपल्या संगीताने तरुणांना वेड लावणाऱ्या संगीतकार नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड (Shravan Rathod ) यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी काल रात्री माहीमच्या एस. एल. रहेजा रुग्णालयात कोरोनाशी झुंज देताना जगाचा निरोप घेतला. कोरोनाचा उपचार करण्यासाठी त्यांच्यावर १० लाखांचा खर्च झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली होती. श्रवण राठोड यांनी एका खासगी विमा कंपनीकडून स्वतःची आरोग्य विमा पॉलिसी काढली असूनही जोपर्यंत पूर्ण बिलाची रक्कम भरत नाही तोपर्यंत त्यांचा मृतदेह नातेवाइकांना देण्यास एस. एल. रहेजा रुग्णालयाने नकार दिला होता. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्याने हिसका दाखवताच रुग्णालयाने श्रवण यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.

जर मृतदेह हवा असेल तर आधी बिलाची संपूर्ण रक्कम जमा करा, असे त्यांच्या परिवार जनांना सांगण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष व माहीम विधानसभेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना ही माहिती कळताच त्यांनी रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आज सकाळी संपर्क साधला. काही तांत्रिक बाबीमुळे काल रात्री मृतदेह देण्यास उशीर झाला झाला होता. श्रवण राठोड यांच्या कुटुंबातील आणि आपल्या संपर्कातील पारिवारिक मित्रांनी सदर बाब आपल्याला आज सकाळी सांगितली. आपल्या सामंजस्य मध्यस्थीने आणि व्यवस्थापनाने संपूर्ण सहकार्य करत अखेर रुग्णालयाने श्रवण राठोड यांचा मृतदेह त्यांच्या परिवाराकडे आज सकाळी सुपूर्द केला. अशी माहिती किल्लेदार यांनी दिली.

अशा सुप्रसिद्ध संगीतकाराच्या कुटुंबीयांसोबत हे होऊ शकते तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल होत असतील, असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अशा कुठल्याही परिवारावर अतिशय संवेदनशील क्षणादरम्यान रुग्णालय असो किंवा दुसरे कुठलेही प्रशासन त्यांनी माणुसकीचा विचार नक्कीच करावा, अशी विनंती किल्लेदार यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी एस.एल. रहेजा रुग्णालयाच्यावतीने प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले आहे. प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन झाल्याने आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. शोकाकूल कुटुंबाच्या या कठीण परिस्थितीत आवश्यक असलेल्या समर्थनासाठी कुटुंबीयांसमवेत मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. आम्ही कुटुंबाच्या संपर्कात होतो. आम्ही कुटुंबाला त्रास दिला, पैशांसाठी आम्ही मृतदेह रोखून ठेवल्याचे सर्व आरोप खोटे आहेत. सदर वृत्त निराधार असल्याचे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button