‘मुख्यमंत्री ठाकरेंच्या आदेशानुसार अहमदनगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार’

CM Uddhav Thackeray - Maharashtra Today

अहमदनगर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी, मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. अहमदनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कायम नगरकरांसाठी मदत पुरवत असतात. गटातटाचे राजकारण सर्वच पक्षात असतात, मात्र पक्षाच्या आदेशापुढे या गोष्टी चालत नाही. येत्या एक जुलैला महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. बाँडवर लिहून देतो, महापौर शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केला.

महापौरपदाची मुदत येत्या ३० जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यासाठी अद्याप निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नाही, मात्र या पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे स्थानिक नेते दावा करीत आहेत. सर्वाधिक २३ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. महापौरपदासाठी लागणारी संख्या गाठण्यासाठी त्यांना काही नगरसेवकांचा पाठिंबा लागणार आहे. याबाबत बोलताना सातपुते यांनी आपली भूमिका विशद केली. ते म्हणाले, की आम्हाला कमी पडत असलेल्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळणार आहे. त्याचे नियोजनही झाले आहे. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. शहराच्या विकासासाठी यापूर्वीही शिवसेनेने मोठे योगदान दिले आहे. शिवसेनेला नगरकरांनी कायम साथ दिली आहे. अनेक वर्षे विधानसभेचे नेतृत्व शिवसेनेच्या आमदारांनी केले आहे. अनेक महत्त्वाची कामे शिवसेनेमुळेच मार्गी लागलेली आहेत. नगर शहरात विकासास मोठा वाव आहे. चांगले उद्योग नगरमध्ये यायला हवे. त्यासाठी पूरक वातावरण निर्माण व्हायला हवे. नागरी सुविधांसाठी मोठ्या निधीची गरज भासणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. आमच्याकडे आरक्षणानुसार उमेदवार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच महापौर होणार आहे.

शिवसेनेतील गट-तटाबाबत बोलताना सातपुते म्हणाले, की शिवसेनेकडे जास्त नगरसेवक असताना मागील वेळी राजकीय घडामोडीत शिवसेनेला या पदापासून वंचित राहावे लागले होते. शिवसेनेत गटातटाचे राजकारण असल्याचा काही लोक सांगत असले, तरी प्रत्येक पक्षात गटातटाचे राजकारण असतातच. इतर पक्षांचेही शहरात गट कमी नाहीत. असे असताना महत्त्वाच्या वेळी हे एकत्र येतात, हा इतिहास आहे. त्यामुळे हा विषय गौण आहे.

याबाबत मुख्यमंत्री किंवा संबंधित वरिष्ठांच्या काही सूचना आहेत काय, याबाबत बोलताना सातपुते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. महापौर शिवसेनेचाच करायचा. तसेच इतर वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा होत आहे. येत्या २४ तारखेला निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महापौर शिवसेनेचा होऊन महापालिकेवर भगवा फडकेल, असा दावा दिलीप सातपुते यांनी केला..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button