राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अरविंद सावंत म्हणाले …

मुंबई :- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येणार का, हा गेल्या काही वर्षांपासून औत्सुक्याचा आणि सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात अनेकदा रंगते. याबाबत मनसे (MNS) नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारले असता, त्यांनी ‘ते परमेश्वरालाच ठाऊक.’ असे उत्तर देत संदिग्धता कायम ठेवली.

‘हो, मी परमेश्वराला मानतो.’ असेही राज यांनी सांगितले. राज यांच्या या उत्तरामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनीही परमेश्वराकडे बोट दाखवले आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा केवळ मीडियात सुरू आहे. निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर अशी चर्चा होत असते, असेही अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा प्रश्नच मला आशावादी वाटत नाही. त्यांना हा प्रश्न का विचारण्यात आला? त्यावर राज यांनी का उत्तर दिलं? हे त्यांनाच माहीत. आता यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच बोलू शकतात. तेच यावर निर्णय घेऊ शकतात, असं सांगतानाच समाजकारण आणि राजकारणात काहीही घडू शकतं, असे सावंत यांनी स्पष्ट केले .

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा नेहमीच होतात. निवडणुकीच्या आधी आणि नंतरही या चर्चा होत असतात. आता मीडिया चर्चा करत आहेत, असे सांगत सगळ्याच गोष्टी भविष्यात बघितल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले . तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. आता ते सामनाचे संपादकही नाहीत, अशी टीका केली होती. त्यावरही सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीसांची ही प्रतिक्रिया गैर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना संजय राऊत संपादक नव्हते. बाळासाहेब ठाकरे हे ‘सामना’चे संपादक होते. राऊतांच्या लेखणीबद्दल बाळासाहेबांनी त्यांचं नेहमीच कौतुक केलं आहे.

राऊत यांच्या लेखणीतून बाळासाहेबांचा विचार आणि संस्कार उतरत असतो. बाळासाहेबांचीच भाषा त्यांच्या लेखणीतून येत असते. त्यामुळे काही लोकांना राऊतांचे मार्मिक बाण टोचतात. त्यामुळे त्यांना त्रास होतो, असा टोला त्यांनी लगावला. विरोधक जे काही बोलत आहेत, नेमकं त्याच्या उलटं घडत असतं. या संदर्भात भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांना काही सल्ला दिला आहे, त्यावर अंतर्मुख होऊन विरोधकांनी विचार केला पाहिजे,असेही सावंत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधानपदासाठी राज ठाकरे यांची ममता बॅनर्जींना पसंती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button