‘या’ अवयवांचा कलाकारांनी उतरवलाय विमा

Actors.jpg

अभिनयासोबतच बॉलिवूड कलाकारांचे शरीर आणि आवाजही त्यांची प्रमुख अस्त्रे असतात. नायिकांच्या सुडौल शरीरयष्टीमुळे त्यांना कामे मिळत असतात आणि तेच पडद्यावर दाखवण्यासाठी त्यांना निर्माता कोट्यवधी रुपये मोजत असतो. कलाकार इनकम टॅक्स वाचवण्यासाठी विविध उपाययोजना करतात. त्यात कोट्यवधींच्या विमा पॉलिसीचाही समावेश आहे. सामान्यतः विमा जीवनाचा, घराचा, दागिन्यांचा, कारचा किंवा औषधोपचारासाठी उतरवला जातो. पण बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या शरीराच्या विविध अंगांचा लाखो आणि कोट्यवधींचा विमा उतरवला आहे.हे वाक्य वाचून तुम्हाला कदाचित धक्काही बसला असेल; पण हे खरे आहे. आज अशाच काही बॉलिवूड कलाकारांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत ज्यांनी शरीराच्या विविध अंगांचा विमा उतरवलेला आहे.

अमिताभ बच्चनच्या अभिनयाने सगळ्यांना मोहित केलेले आहे; पण त्यांचा आवाजहा अभिनयाला चार चांद लावणारा आहे. केवळ त्यांचा आवाज ऐकणारेही कमी नाहीत. त्यांचा आवाज ऐकणे बहुतेकांना आवडते. अमिताभला याची चांगली जाणीव असल्याने त्यांनी स्वतःचा विमा तर उतरवला आहेच; पण आवाजाचाही कोट्यवधींचा विमा उतरवला आहे.

रजनीकांत हा केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील आणि मलेशिया, हाँगकाँग इत्यादी देशांमध्येही त्याच्या फॅन्सची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. त्याचा आवाज आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी एका विशिष्ट शैलीची असते. प्रेक्षकांना त्याची ही शैलीच खूप आवडते. त्यामुळेच रजनीकांतने त्याची शैली कॉपीराईटद्वारे सुरक्षित केली आहेच, त्याने त्याच्या वेगळ्या अनोख्या आवाजाचाही कोट्यवधींचा विमा उतरवलेला आहे.

अमिताभ बच्चनचा जसा खर्जातला आवाज त्याच्या अभिनयाला चार चांद लावतो तशाच आवाजाची दैवी देणगी असलेल्या प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांनी त्यांच्या मधुर आवाजाने अनेक पिढ्यांचे कान तृप्त केले आहेत. लता मंगेशकर यांनीही अनेक वर्षांपूर्वी गळा आणि आवाजाचा विमा उतरवलेला आहे.

‘दोस्ताना’ सिनेमात जॉन अब्राहमने अभिषेक बच्चनसोबत कमालीची केमिस्ट्री दाखवत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या सिनेमातील त्याचा समुद्रकिनारी उभा राहून चड्डी खाली करून हिप दाखवतानाचा काढलेला फोटो प्रचंड गाजला होता. दोस्ताना रिलीज झाल्यानंतर जॉन अब्राहमने त्याच्या हिपचा थोडा थोडका नव्हे तर १० कोटींचा विमा उतरवला होता.

बॉलिवूडमध्ये पुन्हा प्रवेश करू इच्छिणारी आणि सध्या हॉलिवूडमध्ये काम करणारी प्रियंका चोप्रा एकेकाळी बॉलिवूडची मोठी नायिका होती. तिच्या हसण्यावर अनेक जण तेव्हा फिदा होत असत. प्रियंकाला ही बाब चांगली ठाऊक असल्याने तिने तिच्या हसण्याचा लाखोंचा विमा उतरवलेला आहे.

मल्लिका शेरावत ही बॉलिवूडमधील अत्यंत बोल्ड नायिका. मर्डर, हिस्स असे तिचे काही गाजलेले सिनेमे आहेत. केवळ बॉलिवूडच नव्हे तर तिने हॉलिवूडमध्येही काम केले आहे. सुपरस्टार जॅकी चेनबरोबरही ती ‘द मिथ’ नावाच्या सिनेमात दिसली होती. सध्या ती बॉलिवूडमधील सिनेमांमध्ये जास्त दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रिय आहे. या मल्लिका शेरावतने तिच्या पूर्ण शरीराचा ५० कोटींचा विमा उतरवलेला आहे.

नेहा धुपियानेही बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. परंतु तिला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. सध्या ती टीव्ही शोज करताना दिसते. बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांच्या मुलाखती या शोमध्ये ती घेत असते. नेहा धुपियानेही उमेदीच्या काळात तिच्या हिपचा विमा उतरवलेला आहे. जेनिफर लोपेजच्या हिपचा विमा ज्या कंपनीने उतरवला आहे त्यांनीच नेहाशी संपर्क केला आणि तिचा विमा उतरवला. यासाठी नेहाने लाखो रुपये खर्च केले आहेत.

मिनिषा लांबाने काही सिनेमात काम करून लोकप्रियता मिळवली खरी; पण तिलाही म्हणावे तसे यश मिळाले नाही. २००५ मध्ये तिने बॉलिवूडमध्ये यहां सिनेमातून प्रवेश केला होता. त्यानंतर तिने १८-२० सिनेमे केले. नेहाप्रमाणे मिनिषाच्या सुडौल बटची बरीच चर्चा होत असे. ही बाब लक्षात घेऊन मिनिषाने तिच्या बटचा लाखोंचा विमा उतरवला होता.

सनी देओलचा आवाज अमिताभ बच्चनप्रमाणे नसला तरी त्याची डायलॉग डिलिव्हरी मात्र प्रचंड लोकप्रिय आहे. त्याची डायलॉग डिलिव्हरी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करीत असतात. त्याचा ‘दामिनी’ सिनेमातील ‘ढाई किलो का हाथ’ हा डायलॉग किंवा ‘गदर’ सिनेमातील हँडपंप उखडण्याची दृश्ये प्रचंड गाजली. प्रेक्षकांनी त्याला यासाठी डोक्यावर घेतले होते. यशाच्या शिखरावर असताना सनी देओलने त्याची डायलॉग डिलिव्हरी आणि त्याच्या विशिष्ट आवाजाचा लाखोंचा विमा उतरवलेला आहे.

अदनान सामीने त्याच्या अनोख्या गायन शैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि आताही करीत आहे. मात्र त्याने त्याच्या आवाजाचा विमा उतरवलेला नाही तर बोटांचा विमा उतरवला आहे. आता तुम्ही म्हणाल बोटांचा विमा का? तर अदनान सामी हा एक उत्कृष्ट कीबोर्ड वाजवणारा कलाकारही आहे. जगातील तो एक फास्टेस्ट कीबोर्ड प्लेयर आहे. त्यामुळेच त्याने स्वतःच्या बोटांचा कोट्यवधींचा विमा उतरवलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER