संधिवात : आयुर्वेदविचार भाग -२

Arthritis.jpg

संधिवात होण्याची कारणे व त्यामागचा विचार मागच्या लेखात वाचले. यावर चिकित्साविचार काय ते या लेखात बघूया. आयुर्वेदात प्रथम स्वास्थ्यरक्षण यावर भर दिला आहे. विकारांची चिकित्सा ही विकार उद्भवल्यावर केली जाते. परंतु व्याधी होऊ नये त्यासाठी काय?

योग्य आहार-विहाराचे पालन, ऋतूनुसार पंचकर्म चिकित्सा, दिनचर्या, ऋतुचर्या हे सर्व स्वास्थ्य रक्षणार्थ उपाय आहेत. वयानुसार वार्धक्यावस्थेत अवयव क्षीण होतात. रुक्षता वाढते. त्वचा, पेशी शिथिल झालेल्या दिसतात. हाडांचा कट कट असा आवाज येतो. वृद्धावस्था हा वातवृद्धीचा स्वाभाविक काळ म्हणूनच या वयात त्याप्रमाणे आहार-विहारात बदल करणे आवश्यक. इंजिन किंवा गाडीत खरखर आवाज सुरू झाला की काय करतो आपण? तर ऑईल टाकतो. त्यामुळे घर्षण कमी होते. गाडी व्यवस्थित चालते. तसेच शरीरातील वाढलेल्या वाताचे रामबाण औषध आहे तेल, स्निग्धता, मालीश!

तेलाने मालीश ही अगदी बाल ते वृद्ध सर्वांनीच करण्याची गोष्ट. सर्वांत मोठा स्वास्थ्य रक्षणार्थ उपाय. नित्य तेल मालीश त्वचा, पाचन, अस्थि, पेशी, संधी या सर्वांनाच अत्यंत उपयोगी. रोज थोडा वेळ का होईना शरीराला वेळ देणे व तेल अंगाला, सांध्यांना लावणे. अगदी छोटी गोष्ट; पण सांध्यांच्या अनेक विकारांना दूर ठेवणारी. अनेक वातनाशक तेलं आयुर्वेदात सांगितली आहेत. जे वातशमन तर करतेच; शिवाय हाडांना मजबूत करून सांधे कार्यक्षम राहतात. उदा. निर्गुंडी, बला तेल, नारायण तेल, दशमूल तेल इत्यादी. संधिवात, आमवात या दोन्ही सांध्यांना होणारे आजार, दोन्ही अवस्था तज्ज्ञांकडून जाणून त्यानुसार तेल वापरावे.

स्वेदन – वाफ देणे, शेक घेणे. वाताकरिता मालीश व वाफ ही अति उपयुक्त चिकित्सा ठरते. निर्गुडी, एरंड पाल्याने शेकणे किंवा गरम वाळूने. अवस्थेनुसार या द्रव्यांचा वापर करून वाफ संधिवातावर उपयुक्त आहे.

पोल्टीस बांधणे – औषधी वनस्पतींचा गरम करून सांध्यावर लेप बांधणे. त्यामुळे अकडलेल्या सांध्यांना आराम पडतो. एरंड पाने, वात कमी करणारे औषधी यात वापरल्या जातात.

पंचकर्म चिकित्सा – अर्थात तज्ज्ञ वैद्यांकडून या कराव्या. बस्ती पंचकर्म सर्व वातविकारांवर उत्तम चिकित्सा सांगितली आहे.

आहार – मधुर, स्निग्ध, सुपाच्य व ताजे गरम जेवण आवश्यक आहे. थंड आहार, फ्रीजचे थंड पाणी घेऊ नये. आहारात आले, हिंग, सुंठ, जिरे इत्यादी पाचक मसाल्यांचा वापर करावा. आहारात, लठ्ठ व कृश प्रकृती यानुसार बदल करणे महत्त्वाचे ठरते.

अति व्यायाम, अति परिश्रम हे शरीराचा क्षय करतात म्हणूनच ते टाळावे. योग्य मार्गदर्शन घेऊन योग प्राणायाम करावा. आराम करणे हे संधिवाताकरिता लाभकारी आहे. संधिवात उत्पन्न करणाऱ्या कारणांचा त्याग व गुग्गुळ, दशमूल, रास्ना, एरंड, अश्वगंधा इत्यादी अनेक औषधींचा चिकित्सेत उपयोग, कटी, बस्ती, जानुबस्ति, अनुवासन, निरुह बस्ती अशा विविध उपाययोजना रुग्णांना आराम देतात.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER