शिवीगाळप्रकरण : आमदार रणजित कांबळेंना अटक करा; भाजपाचा आंदोलनाचा इशारा

Ranjit Kamble - Ramdas Tadas

वर्धा : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले (Dr.Ajay Dawale) यांना काँग्रेसचे (Congress) आमदार रणजित कांबळे (Ranjit Kamble) यांनी भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ करून पोलीस अधीक्षकांसमोर मारण्याची धमकी दिली. रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा, अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे.

भाजपाचे (BJP) खा. रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या आमदाराची ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा वर्धा शहर पोलीस ठाण्यात आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध विविध कलमात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आ. कांबळे यांनी यापूर्वी अनेक अधिकाऱ्यांना दमदाटी करून शिवीगाळ केल्याची माहिती आहे. परंतु, त्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही म्हणून कांबळे यांची हिंमत वाढत गेली. कांबळे यांच्या जाचाला कंटाळून अनेक चांगले अधिकारी वर्धा जिल्हा सोडून इतरत्र निघून गेले आहेत. डॉ. डवले यांच्यासोबत घडलेला प्रकार निंदनीय असून त्यांनी पोलिसात तक्रार दिल्याने त्यांची हिंमत कौतुकास्पद आहे, असे तडस म्हणालेत.

दरम्यान, डॉ. डवले यांच्या समर्थनार्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या संघटना एकवटल्या आहेत. राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. रणजित कांबळे यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध लावण्यात आलेल्या कलमांमध्ये वाढ करण्यात यावी. येत्या काही तासांत आ. कांबळे यांना अटक न केल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा रामदास तडस यांनी दिला. पत्रपरिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, जि. प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती मृणाल माटे व अन्य उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button