अर्णव गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलली

Arnab Goswami

रायगड : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.

अलिबाग सत्र न्यायालयाचे कामकाज हे मराठीमध्येच चालते. त्यामुळे आरोपीकडून इंग्रजी कॉपीची केलेली मागणी हा निव्वळ टाईमपास आहे. त्यामुळे आरोपीच्या वकीलांची मागणी फेटाळण्यात यावी, असे सांगत सत्र न्यायाधीश आर जे मल्लशेट्टी यांच्या कोर्टाने इग्रंजीमध्ये अनुवादाची ही मागणी फेटाळून लावली.

त्यानतंर आरोपींच्या वकीलांकडून हायकोर्टात काही विषयांवर सुनावणी चालू असल्याचे पेपरवर्क सादर करण्यात आले. त्यानुसार पोलीस कोठडीवरील सुनावणी स्थगित करण्यात यावी अशी मागणी आरोपीच्या वकीलांकडून कोर्टाकडे करण्यात आली. त्यावर निर्णय देत कोर्टाने आजची सुनावणी स्थगित करत येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणीची तारीख दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER