अर्णव गोस्वामींचा अंतरिम जामीन हायकोर्टाने फेटाळला

निकालाआधीच अलिबाग कोर्टात जामीनअर्ज

Bombay HC & Arnab Goswami

मुंबई : अन्वय नाईक या कंत्राटदारास केलेल्या कामाचे पैसे वेळेवन न देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरिम जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. हा निकाल होण्याआधीच गोस्वामी यांनी अलिबाग येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. असा अर्ज केला गेल्यास त्यावर चार दिवसांत निकाल द्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने शनिवारीच दिले होते.

या प्रकरणात अर्णव गोस्वामी, नितेश सारडा व प्रवीण राजेश सिंग या तीन आरोपींना अटक झाली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आमच्याविरुद्ध सध्या चालविलेली जात असलेली केस व त्यात केली गेलेली अटकच मुळात बेकायदा आहे. त्यामुळे ती रद्द करावी, अशा ‘हेबियस  कॉर्प््स’’ याचिका तिन्ही आरोपींनी केल्या होत्या. त्यातच त्यांनी अंतरिम जामिनाचीही विनंती केली होती. न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने शनिवारी सुट्टी असूनही मुद्दाम बसून याचिकांवरील सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. सोमवारी न्यायालयाची दिवाळीची सुट्टी सुरु होऊनही खंडपीठ पुन्हा तेवढयासाठी बसले व त्यांनी अंतरिम जामीन नाकारण्याचा निकाल दुपारी जाहीर केला.

खंडपीठाने म्हटले की, आरोपींना दंड प्रक्रिया संहितेच्या (Cr. P.C.) कलम ४३८ अन्वये सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज उपलब्ध असताना आम्ही राज्यघटनेच्या अनुच्छेद २२६ अन्वये आमचा विशेष रिट अधिकार यासाठी वापरावा असे कोणतेही सबळ कारण आम्हाला दिसत नाही. आम्ही अंतरिम जामीन फेटाळला असला तरी आरोपींचा सत्र न्यायालयात जाण्याचा मार्ग बंद झाला असा त्याचा अर्थ नाही. ते तथे जाऊ शकतात व तसा अर्ज केला गेला तर त्यावर चार दिवसांत निर्णय दिला जावा.

शनिवारी निकाल राखून ठेवतानाही खंडपीठाने हेच स्पष्टिकरण दिले होते. त्यानुसार अर्णव यांनी अलिबाग न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता अर्णव यांचे कोठडीतून बाहेर येणे त्या न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असेल.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER