सुप्रीम कोर्टातील नवी याचिका अर्णव गोस्वामींनी मागे घेतली न्यायमूर्तींच्या स्पष्ट नकारानंतर माघार

Arnab & sc

नवी दिल्ली : मुंबईच्या पोलीस आयुक्तांविरुद्ध पोलीस दलात असंतोष पसरविणे आणि धादांत असत्य व कपोलकल्पित बातम्या देऊन पोलीस दलाची बदनामी करणे या आरोपांवरून ना. म. जोशी पोलीस ठाण्यात नोंदविलेला गुन्हा रद्द करावा यासाठी केलेली याचिका ऐकण्यास न्यायमूर्ती उत्सुक नाहीत हे स्पष्ट झाल्यावर ‘रिपब्लिक टीव्ही’या (Republic TV) वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली नवी याचिका सोमवारी मागे घेतली.

स्वत: अर्णव गोस्वामी व ‘आऊटलायर मीडिया’ या त्यांच्या वृत्तवाहिनीच्या मालक कंपनीने ही याचिका केली होती. न्या. डॉ.  धनंजय चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे ही याचिका पुकारली जाताच गोस्वामी यांचे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे म्हणाले की, गेले काही महिने सरकार व पोलीस या वृत्तवाहिनीच्या व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हात धुऊन  मागे लागले आहे. त्यापासून संरक्षण मिळावे यासाठी ही याचिका करण्यात आली आहे.

अ‍ॅड. साठे हे सांगत असताना, याचिकेत केलेल्या मागण्यांवर नजर टाकून, न्या. चंद्रचूड  त्यांना म्हणाले, तुमची याचिका काहीशी महत्त्वाकांक्षी आहे. तुम्ही ती स्वत:हून मागे घेतल्यास बरे! त्यावर अ‍ॅड. साठे यांनी दाद मागण्याचे अन्य पर्याय खुले ठेवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे पर्याय खुले ठेवून खंडपीठाने याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. थोडक्यात यामुळे गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करू शकतील. पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, केंद्र सरकारने ‘रिपब्लिक टीव्ही’च्या कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, या कर्मचाऱ्यांना अटक करण्यास महाराष्ट्र पोलिसांना मनाई करावी, अशा स्वरूपाच्या विनंत्या याचिकेत करण्यात आल्या होत्या. न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आलेली गोस्वामी यांची ही चौथी याचिका होती.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात याच खंडपीठाने गोस्वामी यांना गेल्या महिन्यात अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच पालघर येथे दोन साधूंच्या झुंडशाहीने झालेल्या हत्यांसंबंधी दिलेल्या बातम्यांवरून राज्यात गोस्वामी यांच्याविरुद्ध विविध ठिकाणी नोंदविलेले गुन्हे एकत्र करण्याचा आदेशही याच खंडपीठाने गेल्या एप्रिलमध्ये दिला होता. मात्र ‘टीआरपी’ घोटाळ्याशी संबंधित गुन्हा रद्द करण्यासाठी केलेली याचिका न ऐकता खंडपीठाने गोस्वामी यांना उच्च न्यायालयाकडे जाण्यास सांगितले होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER