‘टीआरपी’ घोटाळ्यात अर्णव गोस्वामींना ५ मार्चपर्यंत दिलासा

मुंबई :- टीव्ही वाहिन्यांची दर्शकसंख्या लबाडीने फुगविण्याच्या घोटाळ्यात (TRP Scam) अटक होण्यापासून ‘रिपब्लिक टीव्ही’चे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांना मिळालेले तात्पुरते संरक्षण येत्या ५ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. ‘टीआरपी’ घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून सुरु असलेली कारवाई रद्द करावी यासाठी अर्णव गोस्वामी (Arnav Goswami) व ‘आऊटलायर मीडिया लि.’ या ‘रिपब्लिक टीव्ही’च्या मालक कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. न्या. संभाजी शिंदे व मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे त्या आल्या असता सरकारतर्फे वेळ मागण्यात आला. त्यानुसार पुढील सुनावणी ५ मार्च रोजी ठेवण्यात आली. गोस्वामी यांना अटक न करण्याचा पोलिसांनी याआधी दिलेला शब्द तोपर्यंत लागू राहील.

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रास उत्तर देणारे १०० पानी प्रतिज्ञापत्र याचिकाकत्यांनी दोन दिवसांपूर्वी सादर केले. त्यात बरीच नवी कागदपत्रे व नवे मुद्दे असल्याने त्यावर विचार करून उत्तर देण्यासाठी वेळ द्यावा, अशी पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विनंती केली. तसेच कागदपत्रांची संख्या जास्त असल्याने जमल्यास प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणी घ्यावी, असेही ते म्हणाले.

खंडपीठापुढे इतरही अनेक प्रकरण़े असल्याने ही सुनावणी काही आठवड्यांनंतर घेण्याचे न्या. शिंदे यांनी सुचविले. परंतु सुनावणी महिनाभर पुढे गेली तर अटक न न करण्याचे आश्वासन तोपर्यत लागू ठेवणे शक्य होणार नाही, असे सिब्बल म्हणाले. गोस्वामी व आऊाटलायर मीडियातर्फे ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी व्यक्तिगत अडचणीमुळे पुढील तारखेला आपल्याला हजर राहणे शक्य होणार नाही, असे कळविले. या सर्वांचा विचार करून सुनावणी ५ मार्च रोजी ठेवली गेली.गोस्वामींना अटक न करण्याचा दिलेला शब्द त्यानंतर लागू ठेवणे पोलिसांना शक्य नसेल तर गोस्वामी यांना न्यायालयाच्या ओदशाने संरक्षण देण्यावरही त्यावेळी गरज पडल्यास विचार होऊ शकेल.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER