अर्णव गोस्वामी यांची अखेर तळोजा कारागृहातून सुटका

Arnab Goswami

मुंबई : केलेल्या कामाचे पैसे लगेच चुकते न करून अन्वय नाईक या कंत्राटदारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक झालेले ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांची गुरुवारी सकाळी तळोजा कारागृहातून सुटका झाली. कारागृहातून बाहेर पाऊल टाकताच गोस्वामी यांनी ‘हा तमाम भारतीय नागरिकांचा विजय आहे’ अशा शब्दांत आनंद व्यक्त केला व सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईतील राहत्या घरातून अटक झाल्यापासून सात दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर गोस्वामी यांची सुटका झाली. अंतरिम जामीन मंजूर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची  प्रत रातोरात मागवून ती कारागृह प्रशासन व रायगड पोलिसांना दिल्यानंतर गोस्वामी तुरुंगातून बाहेर आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी सुटकेआधी ५० हजार रुपयांचा व्यक्तिगत जातमुचलका लिहून दिला.

दिवाळीची सुटी  असूनही आणि स्वत:चा वाढदिवस असूनही न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी दिवसभर कोर्टात बसून गोस्वामी यांच्या याचिकेवरील युक्तिवाद ऐकला होता. युक्तिवाद संपल्यावर गोस्वामी यांचे ज्येष्ठ वकील हरीश  साळवे न्या. चंद्रचूड यांच्या वाढदिवसाचा संदर्भ देत थट्टेने म्हणाले की, वाढदिवस साजरा करण्याची बहुधा ही सर्वांत  वाईट रीत असावी. त्यावर न्या. चंद्रचूड उत्तरले : नाही, अजिबात नाही. खरं तर माझ्यासाठी वाढदिवस साजरा करण्याची हिच सर्वोत्तम पद्धत आहे. न्यायनिवाडा करणे हेच जणू माझे आयुष्य आहे व ते करणे मला मनापासून आवडते. त्यामुळं वाढदिवशीही तेच करून मला नक्कीच आनंद झाला !

नव्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

अलिबागच्या या प्रकरणात पोलीस अटक करण्यास आले तेव्हा गोस्वामी, त्यांची पत्नी व मुलाने धक्काबुक्की करून त्यांच्या कामात व्यत्यय आणला, अशा आरोपावरून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात नवा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर आता आपल्याला या नव्या गुन्ह्यात अटक केली जाईल या भीतीने गोस्वामी यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER